के.के.रेंज : 'त्या' बाधित गावांतील 'ती' समस्या आता दूर होईलएएमसी मिरर वेब टीम
राहुरी :
''नगर, राहुरी व पारनेर या तालुक्यातील २३ गावांची जमीन संरक्षण खात्याद्वारे अधिग्रहण करण्याचा प्रयत्न होणार असल्याचा गवगवा झाल्याने या भागातील मुलांचे विवाह मुली देत नसल्याने रखडल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे वेगळीच समस्या निर्माण झाली होती. पण आता केके रेंजचा संभ्रम दूर झाल्याने ती समस्याही आता दूर होण्यास मदत होईल'', अशी मिश्किल टिप्पणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी केली. केके रेंज जमीन अधिग्रहणाबाबतचा संभ्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे दूर झाल्याचा दावाही तनपुरे यांनी केला.

केके रेंज लष्करी सराव क्षेत्रासाठी १ लाख एकर वाढीव क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण नुकतीच जिल्हा प्रशासन व लष्करी प्रशासन यांच्यातील संयुक्त बैठकीत असे कोणतेही भूसंपादन होणार नव्हते व होणारही नाही, असे स्पष्ट केले गेले आहे. फक्त लष्करी सरावाच्या काळात संबंधित २३ गावांतील नागरिकांनी घराबाहेर पडू नये व लष्करी सराव क्षेत्रात येऊ नये म्हणून दर पाच वर्षांनी नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री तनपुरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. संबंधित २३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडलेल्या रेडझोनबाबत आवश्यक निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले, की, केके रेंज विस्तारीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जमीन अधिग्रहित केली जाणार नसल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडावा व निश्चिंत राहावे. याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केलेल्या शिष्टाईला यश आले असल्याची माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी राहुरी तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख उपस्थित होते. तनपुरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून तीनही तालुक्यातील २३ गावांमधील शेतकरी जमीन अधिग्रहित होण्याच्या भीतीखाली होते. नगर-मुंबई-दिल्ली अशा ठिकाणी यासंबंधी बैठका झालेल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे शरद पवार व आमदार निलेश लंके यांची बैठक झाली होती. त्या बैठकीस करोना उपचार घेत असल्याने मला उपस्थित राहता आले नव्हते. पवार यांची शिष्टाई सफल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. शेतकऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा पाहून शेतकरी भारावले. संरक्षण मंत्र्यांना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती पवार यांनी निदर्शनास आणून दिलेली होती. गेल्या चाळीस वर्षापासून संरक्षण खात्याकडून दर पंचवार्षिकला संरक्षण विषयक अधिसूचना जाहीर होत असते व त्यातूनच अफवांचा बाजार मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हतबल झाले होते. त्यातच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केल्याने अधिकच भरच पडली होती. त्यामुळे संभ्रमावस्था वाढतच गेली. 

नगर येथे कर्नल कानन यांनी यासंबंधी बैठक घेऊन सर्व खुलासा केला असल्याने शेतकरी बाधित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले. रेड झोनच्या अडचणी राहणार नाही त्यासाठी अधिक लक्ष देणार आहे. जमीन अधिग्रहण करण्याचा कोणताही प्रस्ताव संरक्षण खात्याकडून आलेला नाही. नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून मी माहिती घेतलेली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post