विखेंच्या 'त्या' पुस्तकाची राजकीय क्षेत्रात उत्सुकता; प्रकाशनाची तयारी पूर्ण


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर :
दिवंगत ज्येष्ठ नेते (स्व.) पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी लिहिलेल्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राची उत्सुकता राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मागील ४० वर्षांच्या देशाच्या राजकीय स्थित्यंतराचे साक्षीदार असलेल्या बाळासाहेब विखे यांनी या स्थित्यंतरावर स्फोटक भाष्य त्यांच्या आत्मचरित्रातून केले असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर विखेंनी त्या पुस्तकात नेमके काय म्हटले आहे, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. 

दरम्यान, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे व व्हर्च्युअल पद्धतीने प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासह जिल्ह्यातील १४ही तालुक्यांतून या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्याद्वारे सहकारी साखर कारखानदारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, सहकाराच्या माध्यमातून समाजाच्या विकासाचा वारसा त्यांचे चिरंजीव (स्व.) बाळासाहेब विखेंनी जपला. १९६२मध्ये जिल्हा परिषदेपासून त्यांनी स्वतःच्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात केल्यानंतर ४०-४५ वर्षांच्या काळात खासदारकीच्या माध्यमातून त्यांचा दिल्लीत दबदबा राहिला. या राजकीय वाटचालीत स्पष्टवक्तेपणामुळे ते नेहमी चर्चेत राहिले. काँग्रेस पक्षांतर्गत चर्चेसाठी त्यांनी स्थापन केलेले खासदारांचे विकास फोरम व त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समर्थकांमध्ये पसरलेली अस्वस्थता, तसेच त्यानंतर विखेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेत केलेला प्रवेश, सेनेकडून मिळालेले केंद्रीय मंत्रिपद, पुन्हा काँग्रेस प्रवेश, विदर्भ-मराठवाड्यावर पाणी व अन्य विकासाबाबत झालेल्या अन्यायाला फोडलेली वाचा अशा अनेकविध मुद्यांवर त्यांनी त्या काळात केलेल्या भाष्यामुळे राजकारण ढवळून निघाले होते. 

ज्येष्ठ नेते शरद पवारांशी त्यांचे फारसे कधी जमले नाही, तसेच पवारांचा संबंध असलेला नगरच्या लोकसभा निवडणुकीनंतरचा विखे-गडाख निवडणूक खटलाही गाजला आहे. याशिवाय, नगर जिल्ह्यांतर्गत राजकारणात विखे विरुद्ध इतर सर्व असे नेहमी दिसणारे चित्र अशा अनेकविध मुद्यांवर 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्रात सविस्तर उहापोह केला असल्याचे सांगितले जाते. 

(स्व.) विखे यांनी स्वतःच्या हाताने आत्मचरित्राची १४०० वर पाने लिहिली होती व त्यानंतर त्यांचे संपादन करून ७०० पानांचे आत्मचरित्र केल्याचे सांगितले जाते. मंगळवारी या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर विखे कुटुंबियांद्वारे ते सवलतीत सर्वांसाठी उपलब्ध करवून दिले जाणार आहे. मात्र, या पुस्तकातील जुन्या राजकीय घटनांबाबतचे भाष्य प्रकाशनानंतर राजकीय धमाका उडवण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post