'माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल'; तिच्या व्हिडीओमुळे बॉलिवुडमध्ये पुन्हा खळबळ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. सुशांतचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणानंतरही कलाविश्वातील अनेक धक्कादायक प्रकरणांवरचा पडदा दूर होताना दिसत आहे. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर काही आरोप केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्येच आता महेश भट्ट यांच्या सुनेने लविना लोध हिने त्यांच्यावर आणि तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहे.महेश भट्ट कलाविश्वातील डॉन आहे, त्याच्या एका फोनमुळे कलाविश्वातील सगळं चित्र पालटून जातं असं तिने म्हटलं आहे.

महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पती सुमित आणि महेश भट्ट यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच माझा पती सुमित ड्रग्स आणि मुली सप्लाय करतो असा आरोपही तिने केला आहे.

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “ही सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील”.

दरम्यान, लविना लोध हिने केलेल्या आरोपांनंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. सध्या लविनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post