रेस्टॉरंट, बारसाठी नियमावली जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर, शारीरिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ताप-सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश, बुफे पद्धतीला बंदी, आत सोडताना प्रत्येकाची तपासणी, फक्त ५० टक्के आसनक्षमतेचा वापर करणे आदी बंधने असलेली मार्गदर्शक नियमावली उपाहारगृहे आणि मद्यालयांसाठी राज्य शासनाने शनिवारी लागू केली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची नियमित करोना चाचणी करण्याची अटही मालकांवर घालण्यात आली आहे.

मार्चपासून ग्राहकांसाठी बंद असलेली उपाहारगृहे- मद्यालये ५० टक्के आसनक्षमतेच्या मर्यादेसह सोमवारपासून सुरू होत असून त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली राज्य सरकारने शनिवारी जाहीर केली.

सर्व उपाहारगृहे, मद्यालयांमध्ये अंतर्गत रचनेत बदल करून दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अंतर राहील अशी व्यवस्था करावी, दिवसातून किमान दोन वेळा संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा, कर्मचाऱ्यांना एन-९५ किंवा तत्सम मुखपट्टी देण्यात यावी, सीसीटीव्हीचे चित्रण जपून ठेवण्याची अटही घालण्यात आली आहे. मद्यालयातील मद्याच्या सर्व बाटल्या व इतर साधनांची स्वच्छता चोख ठेवावी, ग्लासचे निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

करोनाची लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी प्रत्येक ग्राहकाची थर्मल गनने तपासणी करावी. शरीराचे तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा अधिक आढळल्यास त्यांना प्रवेश देऊ नये आणि सर्व ग्राहकांचे नाव, संपर्क क्रमांक आदी तपशील नोंदवून ठेवावे. तसेच हे तपशील स्थानिक प्रशासनाला देण्याबाबतची त्यांची संमती घ्यावी. सुरक्षित अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे, ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, रोख रकमेचे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी आणि शक्यतो ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्यावे, स्वच्छतागृहांचे सॅनिटायझेशन ठरावीक अंतराने करावे, रोखपाल आणि ग्राहकांचा थेट संपर्क येणार नाही या दृष्टीने प्लास्टिकचा पारदर्शक पडदा लावावा, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना वापरून फे कता येतील असे हातमोजे व इतर साधने देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.

राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल-रिसॉर्टसारख्या ठिकाणी वरील सर्व नियमांबरोबरच इतरही काही नियम घालण्यात आले आहेत. अतिथींची एकाच वेळी उपाहारगृहात गर्दी होऊ नये यासाठी त्यांना वेळेची आगाऊ नोंदणी करण्यास सांगावे, कक्षांचे दरवाजे उघडण्यासाठी कर्मचारी नेमावेत अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

अटी काय?
  • शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.
  • दारे-खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा. वातानुकू लित यंत्रणा वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
  • शक्यतो शिजवलेले पदार्थच असावेत. सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • टेबल, खुर्च्या, काउंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • ताट-चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि मान्यताप्राप्त जंतुनाशकाने धुवावीत.
  • ग्राहकांना सेवा देण्याच्या वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि निर्जंतुक केलेल्या कपाटात ठेवावीत.
  • भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत.
  • ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजूला जमा न करता तातडीने धुण्यासाठी न्यावीत.

Post a Comment

Previous Post Next Post