मराठा आरक्षण : क्रांती मोर्चानंतर आता मशाल मार्च


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भाजपचा सत्ताकाळ मराठा क्रांती मोर्चाने जसा गाजला तसा आता महाविकास आघाडी सरकारचा काळ मशाल मार्चने गाजण्याची चिन्हे आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने येत्या ७ नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर मशाल मार्च नेला जाणार आहे. मराठा आरक्षण ही मोर्चाची महत्त्वाची मागणी असल्याने या अनुषंगाने प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून, १. मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी व या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा. २. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. ३. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे अॅडमिशन संरक्षित केले जावेत, अशा प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकल मराठा समाज (मुंबई) व मराठा क्रांती मोर्चा (मुंबई) यांच्यावतीने राजन घाग यांनी या मोर्चाबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात म्हटले आहे की, मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. हा रोष विविध आंदोलनातून, बैठकांमधून व्यक्त व्हायला लागला. त्यातच आघाडी सरकारचा एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय यासारख्या काही निर्णयांनी मराठा समाजाच्या असंतोषात भरच पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर या सरकारने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थ्यांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यासाठी घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या सर्व आघाड्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले. मंत्री अशोक चव्हाण हे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती योग्य तो निर्णय घेण्यात नुसती अपयशीच ठरली नाही तर स्वतः चव्हाणही अनेकवेळा नक्की काय करायचे, याबाबतही गोंधळात पडले असल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, मुंबई आणि मराठा क्रांती मोर्चा, मुंबईतर्फे २९ ऑक्टोबरला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ७ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे मशाल मार्च करण्याचे आयोजिले आहे, असे या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले गेले आहे.

मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे तसेच ते अन्यायाविरुद्ध केल्या जाणाऱ्या संघर्षाचेपण प्रतीक आहे. आमची मशाल ही वैचारिकतेची मशाल असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारवर आलेली ग्लानी व मरगळ दूर करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात मुख्य भूमिका निभवावी, असा अर्ज त्यांच्या दारी, मातोश्री येथे ही वैचारिकतेची मशाल नेऊन करणार आहोत. त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व मराठा आमदार आणि खासदार यांना आवाहन करतो आहोत की, समाजापुढे पक्ष दुय्यम अशी भूमिका घेऊन मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी ह्या मशाल मार्चमध्ये सामील व्हावे. प्रस्तावित मशाल मार्च हा आत्तापर्यंत निघालेल्या सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या प्रथेप्रमाणे शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून निघेल, असेही यात स्पष्ट केले गेले आहे. मशाल मार्चचा मार्ग लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीस घाग यांच्यासह सत्यजित राऊत, प्रफुल्ल पवार, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, विलास सुद्रीक, विशाल सावंत, अभिजित घाग, राकेश सकपाळ, मनोज जरांगे, वाघ, पेडणेकर,दिलीप पाटील, श्रीमती कांचन वडगावकर, श्रीमती रुपाली निंबाळकर, श्रीमती मोहना हांडे, जयदीप साळेकर, नामदेव पवार, प्रकाश कदम, योगेश पवार, अमोल जाधवराव, एकनाथ दांगट, महेश यादव, चंद्रकांत चाळके, तुषार बागवे, नारायण गावकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post