मराठा आरक्षण : ठाकरे सरकारची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नांना डोकं वर काढलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीाला अंतरिम स्थगिती दिल्यानं मराठा क्रांती मोर्चासह मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तातडीनं अंतरिम आदेशावर सुनावणी घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.


राज्य सरकारनं नेमलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली. “मराठा आरक्षणा संदर्भात तातडीने घटनापिठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी, अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे वकील अ‍ॅड. सचिन पाटील यांनी आज दुपारी हा अर्ज सादर केला. या अर्जामध्ये SEBC आरक्षणासंदर्भातील ९ सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश तातडीने मागे घेण्याची आवश्यकता विषद केली आहे. या अंतरिम आदेशामुळे राज्य शासनाच्या अनेक नोकरीभरती व शैक्षणिक प्रवेशप्रकिया प्रभावित झाल्या असून, हजारो विद्यार्थी व उमेदवारांवर त्याचा परिणाम झाला आहे,” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“या पार्श्वभूमीवर मराठाआरक्षण प्रकरण तातडीने घटनापिठासमोर सुनावणीस घेण्यात यावे, असे राज्य शासनाने आज सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी सुद्धा राज्य शासनाने मुख्य न्यायमुर्तींना घटनापीठ तातडीने स्थापन करण्याची व सुनावणी घेण्याची लेखी विनंती केली होती,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post