झेंडू वनस्पती मूळची भारतीय नव्हे, जाणून घ्या झेंडूच्या फुलाबद्दल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दसरा, दिवाळी अशा सणांना दारावरील तोरणात आपण झेंडूची फुले ओवतो. आपल्या अंगणात, बाल्कनीत झेंडूची झाडे लावतो. एकूणच आपल्याला खूप जवळची वाटणारी झेंडू ही वनस्पती मूळची भारतीय नाही. या वनस्पतीचे मूळ मेक्सिकोमध्ये आहे. कंपॉझिटी या कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅजेट्स इरेक्टा असे आहे. झेंडूचे झुडूप वाढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हवामान किंवा जमीन आवश्यक नसते. कोणत्याही प्रकारचे हवामान झेंडूला मानवते.

झेंडूची पाने एकाआड येतात. पानावर बारीक लव असते आणि आकारही विशिष्ट असा असतो. पानांना एक वेगळाच गंध असतो. झेंडूची काही फुले एकेरी असतात, काही मोठी गोंडय़ासारखी असतात. पुष्पबंधात दोन प्रकारची फुले एका ठिकाणी जोडलेली असतात, आपण ज्या भागाला पाकळी समजतो ती पाकळी नसून ती अनेक फुले आहेत. त्यांना रे फ्लोरेट्स असे म्हणतात. मधल्या भागावर डिस्क फ्लोरेट्स असतात. अशाच प्रकारची फुले सूर्यफूल, झेनिया, अ‍ॅस्टर, जब्रेरा या वनस्पतींमध्ये स्पष्ट दिसून येतात. नारिंगी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या अनेक जाती आहेत.

आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू हे झेंडूचे काही पारंपरिक प्रकार आहेत. अफ्रिकन झेंडू या प्रकारच्या झेंडूचे झाड एक ते दीड मीटपर्यंत वाढते. झेंडूच्या रंगानुसार या जातीमध्ये बरेच प्रकार आहेत.

फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झाडांची उंची ३० ते ४० सेंमी एवढीच असते. या जातीच्या झेंडूची लागवड बागेचे किंवा रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केली जाते.

पुसा नारिंगी, पुसा बसंती अशा काही सुधारित आणि संकरित जातीही झेंडूमध्ये आहेत. झेंडूचे बियाणे पेरल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर फूल यायला सुरुवात होते. झेंडूचे स्वतंत्र पीक घेतले जाते. किंवा द्राक्ष, पपई अशा फळांच्या बागांमध्येही झेंडूची लागवड केली जाते. भारतातील कर्नाटक राज्य झेंडू उत्पादनात अग्रेसर समजले जाते. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते. कान दुखत असेल तर झेंडूच्या पानाचा रस कानात घालतात. गळू या विकारावरही झेंडूच्या रसाचा उपयोग केला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post