'त्या' इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत; महामंडळ-समित्यांवरील नियुक्त्यांच्या हालचाली सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या महामंडळे व शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांना आता मुहूर्त मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे सुतोवाच केले असून, या महिनाखेरीस या नियुक्त्या मार्गी लागण्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याने शासकीय समित्यांवर जाऊ इच्छिणारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


राज्यात आता शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यातील महामंडळे तसेच शासकीय समित्यांवर अजूनही मागील भाजपच्या सरकारच्या काळातील सदस्यांच्या नियुक्त्या आहेत. अर्थात कोरोनामुळे कोणत्याही शासकीय समित्यांचे कामकाज सुरू नाही. पण राज्यात आता नवे सरकार आले असल्याने या सरकारचे समर्थक असलेल्यांची वर्णी शासकीय समित्या व महामंडळांवर लावण्याची मागणी होत आहे. यादृष्टीने सरकार सत्तेवर आल्यावर लगेच हालचालीही सुरू झाल्या होत्या. पण नंतर लगेच कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्याने सरकारने त्याला प्राधान्यक्रम दिले. कोरोना रुग्ण व त्यांच्यावरील उपचार, त्यासाठीच्या उपाययोजना यात सरकार व्यस्त झाल्याने शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांचा विषय जवळपास बासनात गुंडाळला गेला होता. पण आता कोरोनाचे सावट हळूहळू कमी होत असल्याने शासकीय समित्यांच्या नियुक्त्यांचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. 


नगरला शासकीय समित्यांच्या नियुक्तीचे सूत्र ठरवले होते. महाविकास आघाडीमधील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या समर्थकांना या समित्यांवर संधी मिळावी या हेतूने नियोजन केले गेले होते. ज्या तालुक्यात ज्या पक्षाचा आमदार आहे, त्या तालुक्यातील शासकीय समित्यांवर त्या आमदाराला नियुक्त्यांमध्ये ४० टक्के व तर अन्य दोन मित्र पक्षांना प्रत्येकी ३०-३० टक्के वाटा दिला जाणार होता. तसेच तिन्ही मित्र पक्ष नसलेल्या म्हणजे भाजपचे आमदार असलेल्या तालुक्यात पालकमंत्री असलेल्या पक्षाला 40 टक्के व अन्य दोन पक्षांना 30-30 टक्के वाटप ठरवले गेले होते. पण कोरोनामुळे पुढे हे वाटप प्रत्यक्षात आले नाही. मात्र, आता त्यासाठी मुहूर्त लागणार असल्याने शासकीय समित्यांवर जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागले आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे, मात्र त्याआधीच शासकीय समित्या, मंडळे व महामंडळांवरील राजकीय नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तिन्ही पक्षांचे समाधान होईल, अशा प्रकारे येत्या दहा-पंधरा दिवसांनंतर महामंडळांचे वाटप होईल, अशी माहिती सूत्रांकडून समजली. मात्र, यामुळे ज्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही, असे आमदार तसेच पक्ष समर्थक कार्यकर्त्यांना आता महामंडळे व शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांचे वेध लागले आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोनाचा मुकाबला करण्यात सर्व शासकीय यंत्रणा गुंतल्याने इतर सर्व विषय मागे पडले होते. परंतु कोरोन हळूहळू कमी होत असल्याने महामंडळे व शासकीय समित्यांवरील नियुक्त्या आता राजकीय क्षेत्रातून ऐरणीवर घेण्यात आल्या आहेत. सर्वाचे समाधान होईल, अशा प्रकारे येत्या काही दिवसातच महामंडळे व शासकीय समित्यांचे तीन पक्षांमध्ये वाटप होईल, अशी माहिती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post