येत्या एप्रिलपासून सरकार दुप्पट वेगाने काम करेल : आरोग्यमंत्री टोपेएएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असले तरी या वर्षभरातील बराचसा काळ कोविड नियंत्रणात गेला आहे. मात्र, एप्रिल २०२१पासून राज्य सरकार दुप्पट वेगाने काम करेल, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असताना तो पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून सावध पावले टाकली जात आहेत. धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा त्यामुळे अजूनही बंद आहेत. पण ऑक्टोबरअखेरीस यादृष्टीने काही निर्णय होतील, असे सुतोवाचही त्यांनी केले.

मुंबईहून जालन्याला जात असताना मंत्री टोपे शुक्रवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर काहीकाळ थांबले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना टोपे यांनी कोरोना उपाययोजनांबाबत सरकार करीत असलेल्या कार्यवाहीची तसेच राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त व भविष्यातील योजनांची माहिती दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुभवी व्यक्ती आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्तीला प्राधान्य दिले होते. पण कोविड-१९मुळे अनेक विभागांच्या विकास योजना निधींना कात्री लागली. आवश्यक तेवढेच केले गेले. पण एप्रिल-२१पासून सरकार दुप्पट वेगाने काम करणार आहे. जाहीरनाम्यांतील आश्वासनांच्या पूर्तीला प्राधान्य दिले जाणार आहे, असे सांगून टोपे म्हणाले, राज्यात स्टेबल व प्रोग्रेसिव्ह गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसह शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जाणार आहेत.

त्यांना कारवाईच्या सूचना दिल्यात
ऑक्सिजन पुरवठा तसेच खासगी रुग्णालयांच्या अवास्तव बिलांसह अन्य विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना जबरदस्त अधिकार दिले आहेत. त्यांनी ऑडिटर नेमावेत, भरारी पथके नेमावीत, स्वतः चेकिंग करावे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जात नसेल तर पाचपट दंड आकारण्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोठे ऑक्सिजनचा काळा बाजार, खासगी रुग्णालयांच्या अवास्तव बिल आकारणीची वसुलीसारख्या प्रकारांवर जिल्हाधिकारी-आयुक्तांनी कडक कारवाई केली पाहिजे. यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्याचा लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगून टोपे म्हणाले, एन-९५ मास्क तयार करायला फक्त १२ रुपये खर्च येतो, त्यानंतर कर व नफा जमेस धरला तर हा मास्क १९ रुपयांना मिळणे अपेक्षित आहे. पण बाजारात तो १५० ते २०० रुपयांना मिळतो. दहापटीचा हा नफा रोखण्य़ासाठी आता कारवाई हाती घेतली जाणार आहे. जनतेनेही अन्याय सहन न करता शासनाची धोरणे अभ्यासून त्यानुसार काम होत नसेल तर न घाबरता तक्रार केली पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कर्तृत्ववानांचे आमच्याकडे स्वागत
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेबद्दल बोलताना टोपे म्हणाले, कर्तृत्ववान व्यक्तींचे आमच्याकडे स्वागतच आहे. प्रत्येक पक्षात अशी कर्तृत्वान माणसे आहेत, जिल्ह्या-जिल्ह्यात ती आहेत. त्यांना राष्ट्रवादीत यायचे असेल तर वाट मोकळी करून दिली पाहिजे. मात्र, त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील आमच्या लोकांना बाधा येऊ देणार नाही. पण पक्ष वाढीलाही चालना देणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post