'अदखलपात्र'ची घेणार गंभीर दखल; दुचाकी चोरीबाबत 'आयजीं'चा अजब सल्ला

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पोलिसांच्या दृष्टीने दुर्लक्षित असणारे अदखलपात्र (एनसी) गुन्हे आता दखलपात्र होणार आहेत. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनीच यासंदर्भात जिल्हा पोलिसांना आदेश दिले आहेत. 'एनसी' म्हणजे लहान गुन्हे वाटत असले तरी अन्य मोठ्या गुन्ह्यांची ती आई असते, यातूनच मोठे गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अदखलपात्र म्हणून नोंद होणाऱ्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेण्याचे तसेच नागरिकांसाठी व्हीजिटिंग अवरचे (भेटण्याची वेळ) बंधन ठेवू नये'', असे आदेश पोलिस अधीक्षक व जिल्हा पोलिसांना दिल्याचे महानिरीक्षक दिघावकर यांनी सोमवारी येथे सांगितले.

नगर जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा आढावा दिघावकर यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते. ''वाळू तस्करीसह अन्य संघटित गुन्हेगारी करणारांवर मोका कायद्यान्वये कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत तसेच अशा टोळ्यांना तडीपार करण्याचे अधिकार पोलिस अधीक्षकांनाही असल्याने त्यानुसारही कारवाई करण्याचे सांगितले आहे,'' असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

''गुन्हेगारीत वाढ होऊ नये यासाठी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद होतांना पोलिसांनी त्याची अगोदर दखल घेतली पाहिजे, तसेच पोलिसांनी वेळेचे बंधन पाळू नये, छोट्या तक्रारींची दखल घेतली तर निश्चितपणे गुन्ह्यांना आळा बसेल'', असे सांगून ते म्हणाले, ''जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हेगारीचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची होणारी फसवणूक, महिलांवरील अत्याचार व महिलांची सुरक्षा या विषयांसह प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रलंबित असलेले गुन्हे व नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. भरोसा सेल द्वारे महिलांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाणार आहे, या सेलमध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्या, महिला बाल कल्याण अधिकारी, महिला असलेल्या वकील, महिला डॉक्टर, महिला समुपदेशक अशा सर्वांची सेवा एकाच ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध करण्याचे प्रयत्न असणार आहे. याशिवाय दामिनी पथकाद्वारे महिलांना रस्त्यावरील सुरक्षा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन काळात शरीरासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. खुनाचे येथे चार गुन्हे प्रलंबित आहेत तसेच खुनाचे प्रयत्न, प्रॉपर्टी वरून भांडणे, नातेवाईकांतर्गत भांडणे असे प्रकार वाढले आहेत, ते नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आहेत .क्राईम क्लॉक व क्राईम टाईम टेबल मेंटेन करायला अधिकाऱ्यांना सांगितले, असून मागील दोन वर्षात दरोडे घालणाऱ्या व्यावसायिक टोळ्यांविरुद्ध मोका कायद्यान्वये प्रस्ताव पाठवण्याचे पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आले आहे.'' असे ते म्हणाले.

दुचाकी चोरीबाबत अजब सल्ला
दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याला आळा कसा बसवणार हे विचारल्यावर त्यांनी अजब सल्ला दिला. नागरिकांनी पंधरा रुपयाची साखळी व तीस रुपयांचे कुलूप दुचाकीच्या मडगार्डला लावून आपल्या गाडीचे संरक्षण आपणच करावे. जेणेकरून ७५ टक्के दुचाकी चोऱ्या थांबतील, असे दिघावकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post