एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
भूकंपासारख्या संकटाला आपण सर्वांनी मोठ्या धीराने तोंड दिलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं पिकांचे नुकसान, दगावलेली जनावरं आणि घरांची पडझड मोठी आहे. त्यासाठी सरकार नक्की मदत करेल. मात्र राज्य शासनाला मदतीसाठी काही मर्यादा आहेत. त्यामुळे भरीव मदतनिधीसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौर्यावर आले होते. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील शेतकर्यांना दिलासा देताना पवारांनी संवाद साधला. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकर्यांचं नुकसान मोठे आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणं आवश्यक आहे. मात्र मदत करण्यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि परंडा परिसरात मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबत शेतीतील मातीही वाहून गेली आहे. हे मोठं संकट आहे. सरकारनं अशा काळात खंबीरपणे शेतकर्यांच्या पाठिशी उभे रहायला हवं. आपण त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. राज्यापुढे असलेल्या मर्यादा ध्यानात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील खासदारांसह आपण भेट घेणार आहोत आणि केंद्राकडे भरीव मदतीची मागणी करणार आहे, पवार यांनी यावेळी सांगितले.
सकाळी तुळजापूर येथून पवार यांनी नुकसानग्रस्त भागातील पाहणीच्या दौर्याला प्रारंभ केला. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, लोहारा तालुक्यातील सास्तूर या दरम्यान ठिकठिकाणी थांबून त्यांनी शेतकर्यांची विचारपूस केली. रब्बीच्या पेरणीपूर्वी पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी विनंती यावेळी अनेक शेतकर्यांनी पवार यांच्याकडे केली. यावर पंचनाम्यासाठी येणार्या अधिकार्यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती द्या, अशा सूचनाही शरद पवार यांनी यावेळी केल्या.
Post a Comment