राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून धक्का बसला; शरद पवारांनी धाडले मोदींना पत्र

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मंदिरं उघडण्यासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.

शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे की, “सध्या आपण सर्वजण करोना संकटाशी लढत आहोत. करोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुक्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल शिक्षण दिलं जात आहे”. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करताना राज्यात अनेक महत्त्वाची धार्मिकस्थळं असल्याचं म्हटलं आहे. “सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर तसंच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसल्याचं,” त्यांनी सांगितलं आहे.


“राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.

“पत्रात वापरण्यात आलेल्या अयोग्य भाषेची तुम्हीही दखल घेतली असेल याची खात्री आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जणू काही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिलं आहे असं वाटत आहे. लोकशाहीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुक्त संवाद झाला पाहिजे यावर माझा विश्वास आहे. मात्र मतं आणि भूमिका मांडताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. घटनाक्रम पाहता मुख्यमंत्र्यांकडे आपलं उत्तर मीडियामध्ये प्रसिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

“मी या मुद्यावर मुख्यमंत्री किंवा राज्यपालांशी चर्चा केलेली नाही. मात्र राज्यपालांच्या वागण्याने आपल्याला दुख: झालं असून तो खेद तुमच्यासमोर व्यक्त करत आहेत,” असं शरद पवारांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post