एकनाथ खडसेंच्या भेटीबाबत शरद पवार म्हणाले..

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. एकनाथ खडसे आज मुंबईत दाखल झाले असून शरद पवार तसंच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी एकनाथ खडसे भेटीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भेटीचं वृत्त फेटाळलं आहे. न्यूज १८ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शरद पवारांना एकनाथ खडसेंसोबत भेट होणार का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही”. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

याआधी २३ सप्टेंबरला शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचंही बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. एकनाथ खडसेंनी स्वत: यावर भाष्य करत चर्चेला पूर्णविराम दिला होता. “हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा,” असं ते म्हणाले होते.Post a Comment

Previous Post Next Post