दसरा-दिवाळीसाठी नवीन गाड्या

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

गेली दीड वर्षे मंदीत अडकलेला वाहन उद्योग सावरत आहे. गेल्या दोन महिन्यांत कार व दुचाकी खरेदीदारांची संख्या वाढली आहे. खरेदीदार पुन्हा वैयक्तिक वाहन खरेदीवर जोर देऊ लागले आहेत. प्रवासी वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत चक्क २६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर दुचाकींच्या विक्रीतही ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे गेली काही महिने बाजारातील हालचालींकडे डोळे लावून बसलेल्या वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या नवीन गाड्या बाजारात उतरविण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आता दसरा-दिवाळी सणांचा काळ असल्याने मागणी वाढणार आहे.

भारतीय वाहन उद्योजकांची शिखर संघटना असलेल्या सियामच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत सप्टेंबर २०२० मध्ये २,७०,००० पेक्षा जास्त प्रवासाची वाहनांची विक्री झाली. म्हणजेच प्रवासी वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत चक्क २६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर दुचाकींच्या विक्रीतही ११ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ती १८,४९,००० पेक्षा जास्त जास्त झाली. त्यामुळे नवीन गाडय़ांचे आता बाजारात पदार्पण होत आहे. या वाहनांमध्ये विद्युत सन रूफ, क्रुझ कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, टायर प्रेशर , कूल्ड ग्लोव्ह बॉक्स अशी अनेक वैशिष्टय़े ग्राहकांना देऊ केली आहेत.

एमजीची ऑटोनॉमस ग्लॉस्टर
एमजी मोटर इंडियाने नुकतीच भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्ही, एमजी ग्लॉस्टर सादर केली. भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टर, भारतातील पहिली इंटरनेट इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्ही यानंतर ग्लॉस्टर हे एमजीचे तिसरे उत्पादन आहे. एमजी ग्लॉस्टर ही या सेगमेंटमधील पहिली अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम आहे. यातील काही वैशिष्टय़ांमध्ये अडॉप्टिव्ह क्रूस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आदींचा सहभाग आहे.

‘अमेझ’ची सुधारित आवृत्ती
भारतामधील अग्रेसर प्रीमियम कार निर्माती होंडा कार्स इंडिया लिमिटेडने बुधवारी दसरा-दिवाळी उत्सवकाळातील आपली नवीन घोषणा केली. ‘होंडा अमेझ’ची सुधारित आवृत्ती त्यांनी बाजारात आणली आहे. या मोटारीत नवीन आणि आकर्षक फीचर्स आहेत आणि ती पेट्रोल व डिझेल हे दोन्ही इंजिन पर्याय आहेत. अमेझच्या सुधारित मोटारीत स्मार्ट फीचर्ससह, आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास या वेळी होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या विपणन व विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक राजेश गोएल यांनी सांगितले. सात लाख ते ९ लाख दहा हजारांपर्यंत किंमत आहे.

जग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतामध्ये नवीन लँड रोव्हर डिफेण्डरच्या सादरीकरणाची घोषणा केली. २२१ केडब्ल्यू (३०० पीएस) शक्ती व ४०० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे २.० लिटर टबरेचार्ज फोर-सिलिंडर पेट्रोल इंजिन असलेली नवीन डिफेण्डर दोन आकर्षक रचनांमध्ये उपलब्ध आहे. नवीन डिफेण्डर ९० ची किंमत ७३.९८ लाख रुपयांपासून आहे आणि नवीन डिफेण्डर ११० ची किंमत ७९.९४ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम इंडिया) आहे. डिफेण्डर ११० च्या डिलिव्हरीजना सुरुवात झाली आहे, तर डिफेण्डर ९० च्या डिलिव्हरीजना आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये सुरुवात होईल.

Post a Comment

Previous Post Next Post