'मेरी सहेली'.. महिलांना देणार सुरक्षा; पहा काय आहे रेल्वेचा नवा उपक्रम..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतीय रेल्वेच्या वतीने ऑपरेशन 'मेरी सहेली' उपक्रम हाती घेण्यात आला असून, रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना याद्वारे सुरक्षा दिली जाणार आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने महिला प्रवाशांना संपूर्ण प्रवासामध्ये सुरक्षेसाठी सर्व विभागांमध्ये मेरी सहेली हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने त्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या नव्या मेरी सहेली उपक्रमाबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या पुढाकाराने महिला प्रवाशांसमवेत संवाद केला जात आहे. विशेषतः ज्यावेळी एकट्या महिला प्रवास करतात, अशा महिलांबरोबर बोलून प्रवासादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती त्यांना देण्यात येत आहे. त्यांना प्रवासामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली तर 182 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्याविषयी सांगण्यात येत आहे. हे कार्य करताना रेल्वे सुरक्षा दलाच्या गटाकडून केवळ महिलांसाठी आरक्षित झालेले आसन क्रमांक एकत्रित करते. त्या महिला प्रवाशांना प्रवासामध्ये कोणकोणती स्थानके लागणार आहेत आणि गाडी कोठे थांबणार आहे, याची माहिती दिली जाते. तसेच एकट्या महिला प्रवाशांकडे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लक्षही ठेवतात.

रेल्वे सुरक्षा दलाकडून संबंधित महिला प्रवाशांकडून अभिप्राय नोंदवून घेण्यात येत आहेत. या अभिप्रायाच्या विश्लेषणानंतर आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा सेवेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. मेरी सहेली उपक्रमाअंतर्गत महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासामध्ये काही त्रास झाला तर त्या समस्येचा निपटारा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे. मेरी सहेली उपक्रम सुरुवातीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागात सप्टेंबर, 2020 मध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. या प्रयोगाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे आता रेल्वेच्या सर्व विभागामध्ये राबविण्याच्या दृष्टीने माहिती जमा करण्यात येत असून या उपक्रमाला गती देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post