सर्दी-कफापासून ते वजन घटवण्यापर्यंत फायदेशीर आहेत मनुके!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलत्या हवामानाचा मानवी शरीरावर परिणाम होतोच. घशाची खवखव, तापापासून ते अंगदुखीपर्यंत अनेक त्रास आपल्याला भेडसावतात. त्यात सध्याची धकाधकीची जीवनशैलीही भर टाकते. अशा वेळी आहारात काही सोपे बदल करून तुम्ही स्वतःचं आरोग्य उत्तम राखू शकता. सतत औषधं घेण्याऐवजी काही विशिष्ट पदार्थांचं सेवन अशा वेळी लाभदायक ठरू शकतं. यात तुम्हाला बेदाणे म्हणजेच मनुका फायदेशीर ठरू शकतात.

जर तुम्हाला कफाचा किंवा सर्दीचा त्रास होत असेल तर रात्री दुधातून चार ते पाच मनुका उकळून घ्या. ते प्राशन केल्याने तुमची सर्दी दूर होईल.

वाढत्या वजनावर देखील मनुका गुणकारी आहेत. अनेकदा वाढत्या वजनावर महागडे डाएट सुचवले जातात. पण, मनुका तुम्हाला यातही सहाय्यकारी ठरू शकतात. रोज थोड्या प्रमाणात मनुकांचं सेवन केल्यास पेशीतील चरबीला घटवते. तसंच यातील ग्लुकोजमुळे बराच काळ एनर्जीही टिकून राहते.

शरीरातील अवयवांना मजबूत करण्यासाठी मनुका उपयुक्त असतात. मनुक्यात असणारं कॅचेटिन नावाचं द्रव्य आपल्या शरीराच्या अवयवांना मजबूत ठेवण्यात मदत करतं.

शरीरासोबत मनासाठीही उपयुक्त
मनुकांचं सेवन शरीरासोबत मनासाठीही उपयुक्त असतं. मानसिक ताण असलेल्या व्यक्तींनी मनुकांचं नियमित सेवन केलं पाहिजे. मनुकांत असणारा अर्जिनाईन नावाचा घटक ताण कमी करतो. रोज सकाळी मनुकांच्या सेवनासोबत ध्यानधारणा केल्याने ताण कमी होऊ शकतो.

ज्यांना जंक फूड खायची सवय असेल त्यांच्या त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. पण, जर आहारात मनुकांचं सेवन केलं तर त्वचेचा पोत आणि तिचं आरोग्यं सुधारतं आणि तिची चमक दीर्घकाळ टिकते. ज्यांना केसगळतीची समस्या असेल, त्यांच्यासाठीही मनुका लाभदायक असतात.

ज्यांना उच्च रक्तदाब असतो त्यांच्यासाठीही मनुका फायदेशीर आहेत. मनुकांमुळे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रियेवर नियंत्रण राहतं आणि हायपरटेन्शनसारखे त्रास दूर होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post