आता खासगी रुग्णालयांमध्ये 'या' दरात मिळणार रेमडेसिविर!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
खासगी रुग्णालयांत रेमडेसिविर इंजेक्शन २,३६० रुपयांत उपलब्ध होणार आहे. करोनाबाधितांना हे औषध वाजवी किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने दरनिश्चिती केली आहे.

रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किमतीत हे औषध मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे; परंतु खासगी रुग्णालयांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर येऊ लागल्या. त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसिविर उपलब्ध होण्याकरिता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्हय़ातील खासगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत.

राज्यामध्ये ५९ औषध केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात पाच, कोकण विभागात दहा, नागपूर विभागात सहा, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात नऊ, बृहन्मुंबई विभागात पाच आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा करोना अहवाल, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले ओळखपत्र, तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

करोनाप्रतिबंधासाठी अमेरिकेत रेमडेसिविरला अधिकृत मान्यता
जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार करोनाच्या गंभीर रुग्णात गुणकारी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे. याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती. आता हे औषध पूर्णपणे कोविड १९ उपचारात समाविष्ट करण्याच्या निर्णयामागे अमेरिकेतील करोना साथीत लाखो लोक बळी पडले असल्याचा अध्यक्षीय निवडणुकीत गाजत असलेला मुद्दा व कंपन्यांचे अर्थकारण यासारखी कारणे असू शकतात.

या औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण १५ दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले. अमेरिकी राष्ट्रीय आरोग्य संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अमेरिकेच्या औषध प्रशासनाने करोना उपचारात रेमडेसिविर औषधाला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती, नंतर अलीकडे ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग झाला असता त्यांना रेमडेसिविर औषध देण्यात आले होते. या औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध १२ वर्षांवरील किमान ४० किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलीतही काही प्रकरणात या औषधाचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकतो. रेमडेसिविर औषधाने विषाणूतील जो घटक त्याची पुनरावृत्ती करून असंख्य विषाणू तयार करतो त्याला रोखले जाते. हे औषध हायड्रॉक्सी क्लोरोक्विन बरोबर वापरल्यास त्याची परिणामकारकता कमी होते. कोविड १९ विरोधात पहिले औषध मान्य करण्यात आल्याचा आनंदच आहे, असे गिलीडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मेरडाड पार्सी यांनी सांगितले. आतापर्यंत पन्नास देशात रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्याच्या किमतीचा मुद्दाही वादग्रस्त असून कुठल्याही अभ्यासात हे औषध करोनावर उपयुक्त असल्याचे सिद्ध झालेले नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. गिलीड कंपनीने या औषधाची किंमत २३४० डॉलर्स ठेवली आहे. अमेरिकेतील आरोग्य कार्यक्रमात तिचा समावेश केला आहे. अमेरिकेत ज्यांचा विमा आहे त्यांना ते औषध ३१२० डॉलर्सना दिले जाते. आतापर्यंत ‘डेक्सॅमिथॅसोन’ हे एकच औषध करोनावर गुणकारी ठरले असून त्यामुळे कोविड १९ विषाणूने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post