..तर वाईट परिणाम भोगावे लागतील; संभाजीराजेंचा इशारा

  

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवलं आहे. सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? असे पश्न संभाजी राजे यांनी विचारले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. कारण ही परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. सिद्धार्थ शिंदे नावाचा वाईचा मुलगा आहे. सध्या करोना बाधित आहे तो कसा परीक्षा देणार? असाही प्रश्न खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे. परीक्षेला बसणारी दोन लाख मुलं करोनाबाधित झाली तर त्याला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला.

MPSC ची परीक्षा घेण्यासाठी सरकार घाई का करतं आहे? यामागे काही षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांची वयाची अट शिथिल करुन मर्यादा वाढवा सर्वांना सोबत घेऊन चला अशी माझी सरकारला सूचना आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकार ऐकत नसेल तर मराठा समाज एमपीएसीची केंद्रं बंद करेल, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाजातील वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद करणार नाही मात्र मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल असाही इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post