राष्ट्रीय की राज्य वादात रस्ता झाला खड्डेमय; मंत्री थोरात व खासदार लोखंडेंचे दुर्लक्ष?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या चार पदरी नांदूर शिंगोटे ते लोणी कोल्हार महामार्गास कोणी वाली आहे का नाही, असा सवाल नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी उपस्थित केला आहे. राज्य महामार्ग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे सांगितले जाते, पण या दोन्ही यंत्रणाकडून दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे. जिल्ह्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यांचेही या रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, असा दावाही चकोर यांनी केला आहे.

याबाबत बोलताना चकोर यांनी सांगितले की, नाशिक व नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा नांदुर-शिंगोटे ते लोणी( लांबी सुमारे 38 कि.मी.) रस्ता गेल्या दीड-दोन वर्षापासून पूर्णतः उखडला असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. नांदूर शिंगोटे ते लोणी जिल्हा राज मार्ग नव्यानेच नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आला असून हा रस्ता चार पदरी प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे नगर जिल्ह्यातील प्रमुख्याने संगमनेर, कोपरगाव, राहता, शिर्डी, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांमधील सुमारे 30 ते 40 गावे व त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सुमारे 15 ते 20 गावे दळणवळणाद्वारे नाशिक-पुणे महामार्ग क्रमांक 60 ला जोडली जाणार आहेत. त्यामुळे शेती विकास, इंडस्ट्री, व्यापार व मोठी आर्थिक उलाढाल होवून या विभागाची निश्‍चित प्रगती होणार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय खराब व खड्डेमय झाली असून अनेक वाहनांचे अपघात होऊन वाहनचालक, प्रवासी मृत्युमुखी व जखमी झाले आहेत. मात्र, या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (संगमनेर) व सार्वजनिक बांधकाम विभाग (नाशिक यांच्याकडे वेळोवेळी या भागातील जनतेने अर्ज व विनंती करूनही दुरूस्ती करण्यात आलेली नाही, असे सांगून ते म्हणाले, याबाबत माहिती घेतली असता हा मार्ग हा नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित झाला असल्याने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती करण्यास आर्थिक तरतूद उपलब्ध होत नसल्याचा दावा केला व रस्ता दुरुस्तीबाबत असमर्थता दर्शवली व नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडेच पाठपुरावा करण्यासाठी सांगितले. संबंधित नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या यंत्रणेकडून मात्र या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत नाही. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात तीन महिन्यापासून पडणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था पूर्ण खराब झाली असून रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवणे अथवा पायी चालणे देखील जनतेला मुश्कील झाले आहे. तसेच अलिकडेच गेल्या तीन-चार महिन्यापूर्वी या चार पदरी रस्त्यासाठी जमीन भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे राजपत्र देखील केंद्रीय बांधकाम विभागाकडून (नॅशनल हायवे अॅथोरिटी) प्रसिद्ध झाल्याचे समजते, परंतु ही कार्यवाही कधी सुरू व पूर्ण होईल, भूसंपादन कधी होईल, प्रत्यक्ष रस्त्याचे काम कधी होईल याबाबत कोणतीही निश्चित़ता नसल्याने या भागातील जनतेचे दळणवळणाच्या गैरसोयींमुळे (रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे) यापुढील काळात किती हाल होणार आहेत, याची कल्पना करवत नाही.

विशेष महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच्या भाजप-सेना युतीच्या सरकारच्या कार्यकाळात देखील या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती, परंतु त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही. सद्यस्थितीत या तालुक्याचे असलेले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देखील या भागातील जनतेने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे, परंतु दुरुस्तीबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. उत्तर नगर जिल्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या भागातील जनतेच्या या रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे अजिबात लक्ष दिले नाही त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा रस्ता लवकर खड्डेमुक्त करावा अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post