दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप भाडोत्री नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागलं. जीएसटीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरून निशाणा साधला. “दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत,” अशा शब्दात ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे, भाजपा नेते, राज्यपाल यांच्यावर शरसंधान साधलं. ठाकरे म्हणाले, सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडं लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे,

आम्ही बोललो. जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील. केंद्राकडे जून महिन्यापासून आपत्तीग्रस्तांसाठी पैसे मागितले. त्यासाठी एक छदाम आलेला नाही. मागायचे नाहीत का पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता? दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत. का पैसे मागायचे नाहीत. लग्न आम्ही केलं. जरूर केलं. पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाला, मोजतोय की काय करतोय देव जाणो,” अशा शब्दात ठाकरे यांनी दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली.

Post a Comment

Previous Post Next Post