मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा भाजपाचा पराभव; शिवसेनेची टीका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत. मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे!, अशा शब्दात शिवसेनेने 'सामना'तून भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हटलेय अग्रलेखात, वाचा सविस्तर..

कश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱया घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीक्र आहेत. काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे (Nation want to know!). कश्मीर हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने 370 कलम हटवून कश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. 370 कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण 370 कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच कश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता कश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी 370 कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, 370 कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे. या

दोन्ही नेत्यांची भाषा

फुटीरतेची आणि चिथावणीची आहे. तिरंग्याचा अवमान हिंदुस्थान कधीच सहन करणार नाही. ही देशभावना आहे. गेल्या 5 ऑगस्टला घटनेतील 370 कलम काढून फेकून देण्यात आले. तोपर्यंत जम्मू-कश्मीरला वेगळे निशाण व वेगळे संविधान होते आणि हा प्रकार भारतमातेच्या काळजात सुरी खुपसल्याप्रमाणे वेदना देत होता. या दोन तरतुदींमुळे जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानच्या नकाशावर असूनही हिंदुस्थानच्या पोटातील स्वतंत्र राष्ट्र म्हणून डरकाळ्या फोडीत होते. मोदी-शहा यांनी हे स्वतंत्र राष्ट्र बरखास्त केले हे खरे. पण आजही कश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? 370 कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. लष्कराचा बंदोबस्त पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यांचे भयही जास्त निर्माण झाले आहे. 370 कलम हटवताच कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे. भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱयांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव आहे. 370 कलम असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे 370 कलम काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे

एक रुपयाचीही गुंतवणूक

होऊ शकलेली नाही. बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेले तरुण पुन्हा जुन्याच अतिरेकी मार्गाने निघाले आहेत व ‘370’ प्रेमी पुढारी या तरुणांची डोकी भडकवीत आहेत. कश्मीरातून लेह, लडाख बाजूला काढले. त्या लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे. तिरंगा फडकवू पाहणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडून नेले. हे पोलीस पाकिस्तानचे नव्हते. याच मातीतले होते. कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? मुंबईस पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या डुप्लिकेट मर्दानी राणीला दिल्लीचे सरकार केंद्रीय सुरक्षेचे कवच देते. त्या कवचकुंडलात ती महाराणी मुंबामातेचा अवमान करते, पण कश्मीरात भारतमातेच्या सन्मानार्थ तिरंगा फडकवणाऱया तरुणांना खेचून नेले जाते. त्या पोरांना संरक्षण नाही आणि तिरंग्यासही संरक्षण नाही. हे आक्रित आहे. हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे. याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत. मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकडय़ांचा नाही. जेथे पाकडय़ांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकटय़ा नटीने लालचौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे!

Post a Comment

Previous Post Next Post