'भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात..'


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत राज्यपालांना उत्तर दिलं. भाजपाचं आंदोलन सुरू असताना राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून आता शिवसेनेनं राज्यपालांवर टीकेचा बाण सोडला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात, हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत, अशा शब्दात शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

वाचा संपूर्ण अग्रलेख..

गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?

राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱया पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत. राज्यपाल पदावरील बुजुर्ग व्यक्तीने आपल्या मर्यादा सोडून वागले तर काय होते, त्याचा धडा देशातील सर्वच राज्यपालांनी घेतला असेल. राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे तसे कारण नव्हते. हे आंदोलन सुरू असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. ठाकरे यांनी कडक शब्दांत सांगितले की, ‘राज्यपाल महोदय, घटनेनुसार तुम्ही राज्यपाल पदाची शपथ घेतली. तुम्हाला देशाची घटना, सेक्युलॅरिझम मान्य नाही काय? आणि तुम्हाला आमच्या हिंदुत्वाची उठाठेव करण्याची गरज नाही. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी

एक लोहारकी देत

महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले? मुख्य म्हणजे या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचेही वस्त्र्ाहरण झाले. राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. हे सर्व प्रकरण आपल्यावरच अशा पद्धतीने उलटवले जाईल व तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्र्ाs पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम आहे असे चार तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी सांगतात व त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वा न करता भाजपवाले व त्यांचे राज्यपाल मंदिरे उघडा, गर्दी झाली तरी हरकत नाही, असा घोषा लावतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. रेस्टॉरंट उघडले ते नियमांचे कोटेकोरपणे पालन करून. देवांना बंद करून ठेवायला कुणाला आनंद वाटत नाही; पण एकदा मंदिरात प्रचंड गर्दीचे लोंढे आले की कोरोना संक्रमणाचे लोंढे वाढतील यावर देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. भाजपास प्रार्थना स्थळे उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटायला हवे व त्याबाबत संपूर्ण देशासाठीच एक राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. तेच योग्य ठरेल. मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे का उघडत नाहीत? तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला आहे काय? असे प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवल्याचे दिसत नाही. देशातील अनेक प्रमुख मंदिरे बंदच आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठीच हे कटू निर्णय घ्यावे लागतात. आपले राज्यपाल भगतसिंग हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. गोवा ही खऱया अर्थाने देवभूमीच आहे. मंगेशी, महालक्ष्मी, महालसा अशी सर्व देवस्थाने गोव्यात आहेत. गोव्याचे राजकारण, अर्थकारण मंदिरे व इतर प्रार्थना स्थळांवरच सुरू असते. गोव्यातही रेस्टॉरंटस् चालू आणि मंदिरे तशी

कुलूपबंदच

आहेत. काही छोटी मंदिरे उघडायला तेथे परवानगी देण्यात आली असली तरी मंगेशी, महालसा, महालक्ष्मी, श्री कामाक्षी संस्थान ही मोठी देवस्थाने बंदच आहेत. आता तर कामाक्षी देवस्थानातर्फे साजरा होणारा प्रसिद्ध दसरा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. कारण उघड आहे. ही सर्व भक्तांची मोठी गर्दी होणारी मंदिरे आहेत. भक्तांची गर्दी वाढून कोरोनाच्या विळख्यात सामान्य जनता सापडू नये हाच विचार ही मंदिरे बंद ठेवण्यामागे असणार हे स्पष्ट आहे. हीच भूमिका महाराष्ट्र शासनाचीदेखील आहे. मग मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? हे असले सवाल-जवाब फक्त महाराष्ट्रातच सुरू आहेत. कारण येथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती. भारतीय जनता पक्षाचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. या पदाची एक प्रतिष्ठा व शान आहे तशी ती मुख्यमंत्री पदाचीही आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे. हिंदुत्वाचा अपमान करणाऱया, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱया एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? इतकेच कशाला, भाजपचे ‘मुखपत्र’ असलेल्या एका वृत्त वाहिनीचे तुघलकी मालक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत घाणेरडे हल्ले करतात हा मुख्यमंत्री या लोकनियुक्त संस्थेचा अपमान आहे, असे वाटून त्या भाजपाई तुघलकाची कानउघाडणी केली असती तर राज्यपालांची उंची, सन्मान वाढला असता. पण गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?

1 Comments

  1. माघारी बोलवा, संविधान वाचवा

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post