जीवघेण्या ‘स्ट्रोक’चा धोका कमी करतात हे आठ पदार्थ!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
स्ट्रोक हा अत्यंत धोकादायक आजार आहे. जगभरात दर 40 सेकंदांत एक व्यक्ती स्ट्रोकची शिकार होते. त्यामुळे स्ट्रोकविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. स्ट्रोक हा आजार धोकादायक असला तरी तुम्ही आहारात काही बदल करून त्याला रोखू शकता!

स्ट्रोक का येतो?
मेंदूला रक्तपुरवठा सतत होत राहणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं. रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये काही कारणाने अडथळा निर्माण झाला तर मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे स्ट्रोक येणे.

काय आहेत लक्षणं?
स्ट्रोकची तीव्रता कमी असेल तर शरीराचा अर्धा भाग लुळा पडणे, जीभ जड होणे इत्यादी लक्षणे दिसतात. स्ट्रोकचं प्रमाण अधिक असल्यास जोरदार उलटी होणे, बेशुद्धावस्था येणे अशी लक्षणं दिसतात. काही वेळा ही लक्षणं गंभीर असतात. त्यामुळे माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो.

आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

लो फॅट प्लेन योगर्ट
अनेकांना डेअरी प्रोडक्ट्स आवडतात. पण त्यात असलेले फॅट धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कमी फॅट असलेले पदार्थ सेवन करा. लो फॅट प्लेन योगर्ट तुमच्या आहारात समाविष्ट करा, त्याने तुमच्या रक्ताभिसरणाला मदत मिळते. तसंच यात असलेले तंतू तुमच्या हृदयासाठीही फायदेशीर आहेत.

केळी :
आहारात पोटॅशियमची योग्य मात्रा स्ट्रोकचा धोका कमी करते. जे लोक विशेषतः महिला पोटॅशियमचं योग्य प्रमाणात सेवन करतात, त्यांना स्ट्रोकचा धोका कमी असतो.

रताळे :
ज्यांना उच्च रक्तदाब असतो, त्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो. अशा लोकांनी आहारात रताळ्याचा समावेश करावा. यात असलेले फायबर आणि पोटॅशियम तुमच्या शरीरासाठी लाभदायक आहेत.

ब्रसल्स स्प्राऊट :
कोबीप्रमाणे दिसणारे ब्रसल्स स्प्राऊट हे देखील स्ट्रोक नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. एक कप ब्रसल्स स्प्राऊटमध्ये 350 ग्रॅम पोटॅशियम असतं. तुम्ही याला शिजवून किंवा उकडून खाऊ शकता.

मासे :
माशांमध्ये ओमेगा-3 नामक फॅटी अॅसिड असतं. हे अॅसिड शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलची मात्रा वाढवतं आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करतं. त्यामुळे माशांचा आहारात समावेश करावा.

दलिया :
दलिया हा फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठी दलिया उपयुक्त असतो. सकाळच्या नाश्त्यात दलियाचा समावेश केल्याने तुम्हाला स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होते. दलिया सूप किंवा पुलावप्रमाणे शिजवून तुम्ही खाऊ शकता.

अक्रोड-बदाम :
माशांप्रमाणेच अक्रोड आणि बदामात ओमेगा -3 हे फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे तुम्ही अक्रोड-बदाम खाऊ शकता. फक्त हे खाताना त्यावर साखर किंवा मीठ यांपैकी कशाचेही आवरण नसेल याची काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

अॅवोकाडो
अॅवोकाडो नावाचं फळ मेंदूच्या धमन्यांसाठी उपयुक्त असतं. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतात. त्यामुळे स्ट्रोकतर नियंत्रित होतोच, पण कर्करोग, आर्थरायटिस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते उपयुक्त आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post