मंदिरांमुळे भरतात अनेकजण पोट; सोशल मिडियावर मंदिरे उघडण्यासाठी सुरू प्रचार मोहीम

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मदिरालये सुरू झाली, पण मंदिरे अजूनही बंदच आहेत, अशा घोषणा देत एकीकडे भाजपद्वारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात असताना आता दुसरीकडे व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियातून मंदिरांमुळे भरतात अनेकजण पोट, अशा आशयाच्या पोस्टद्वारे भाविकांची जनजागृती केली जात आहे.

मंदिरांतून भाविकांची गर्दी झाली तर कोरोना संक्रमण वाढण्याची भीती असल्याने महाविकास आघाडी सरकारकडून अद्याप मंदिरे उघडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियातून मात्र मंदिरांच्या अर्थकारणाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. ऐतिहासिक व धार्मिक स्थळी नेहमी भटकंती करणाऱ्याने मंदिरांच्या अर्थकारणावर भाष्य केले आहे. हे भाष्य तेथील निरीक्षणातून आल्याचा त्याचा दावा आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मंदिरं काय... तुमची पोटं भरण्यासाठी चालू केलेली फॅक्टरी... असे वाक्य अनेक वेळेला अनेकांकडून ऐकवले जाते. पण मला भटकंतीची आवड असल्यामुळे बऱ्याच मंदिरांमध्ये जाणं होतं आणि बऱ्याच गोष्टी निरीक्षणास येतात. एक-एक करीत किती लोक मंदिरावर अवलंबून असतात हे यानिमित्ताने पाहुयात..

  • देवाच्या दर्शनासाठी मंदिरांच्या ठिकाणी आपण आपली दुचाकी वा चारचाकी गाडी घेऊन जातो आणि पार्किंगला लावताना एक माणूस तिथे बसलेला असतो, त्याच्या हाती आपण १० किंवा २० रुपये देऊन पावती फाडतो आणि आपली गाडी लावून पुढे जातो. धरून चला दिवसाला इथे ५०० गाड्या आल्या, म्हणजे ५०० गुणिले २० = १०.०००/- दिवसाचे. म्हणजे महिन्याचे ३ लाख. सगळा खर्च वगैरे जाऊन त्याला त्यातून पगार मिळत असेल, हे तर निश्चित? म्हणजे मंदिरामुळे पहिला लाभ झाला तो पार्किंग करून घेणाऱ्या माणसाला.
  • गाडी लावून झाली कि आपण आतमध्ये चालत जाऊ लागतो. आजूबाजूला अनेक दुकाने दिसतात. काही ठिकाणी देव-देवतांच्या मूर्ती विकल्या जात असतात तर काही ठिकाणी फोटो फ्रेम. काही ठिकाणी लहान बाळांची-मुलांची खेळणी तर बऱ्याच ठिकाणी दागिने-मेकअप साहित्य, कपडे सुद्धा. काही ठिकाणी स्वयंपाक घरातील सामान विकले जात असते तर काही ठिकाणी प्रसाद. आता या सगळ्या गोष्टीकडे नीट लक्ष देऊन पहिले तर दिवसात येणाऱ्या १००० भाविकांपैकी १०० भाविक जरी इथे थांबून काही विकत घेऊन गेले तर कमीत कमी एक व्यापारी १००० रुपये तरी कमावेल. म्हणजे महिन्याला ३० हजार. खर्च वगैरे सगळं जाऊन २०,००० हजार त्या व्यक्तीला मिळत असतील. म्हणजे दुसरा लाभार्थी झाला व्यापारी.
  • आता पुढे जात जात आपण घेतो प्रसाद आणि मंदिरात लागणाऱ्या विविध सामानाच्या दुकानाकडे जातो. कोणी पेढे विकतं तर कोणी गाठी, ओटीचे साहित्य, नारळ तर काही जण पान-फुलं विकतात तर काहीजण तेल, मीठ, अंगार-धुपारे असे विकत असतात. म्हणजे हेही मंदिरामुळे लाभार्थी झाले. आता अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे पेढे विकणारे लोक परंपरेने दुकाने चालवतात.
  • आपण आपल्या हातात सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जात असताना, आपल्याला दिसतो तो चपरासी. आपण आपल्या आणि आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना घेऊन आलेल्या लोकांच्या चपला त्या व्यक्तीच्या हाती स्वाधीन करतो आणि १० ते १५ रुपये अशी पावती देऊन पुढे दर्शनास जातो. पुढे जात असताना समोर येतात लहान मुलं... ज्यांच्या हातात असतो गंध. ते आपल्या मागे लागतात गंध लावून घेण्यासाठी आणि आपण मग त्यांच्याकडून गंध लावतोच आणि आपल्याकडे असलेले १० ते १५ रुपये आपण त्यांना देतो. म्हणजे हेही मंदिरामुळे लाभार्थी झाले.
  • आपण पायऱ्या उतरत किंवा चढत मंदिराच्या इथे पोहोचतो. पुढे सरकत सरकत आपण रांगेत लागतो. रांगेत भाविकांना शिस्तीने लावण्यासाठी तिथे चार-पाच गार्ड थांबलेले असतात. आता ते काही फुकट तर निश्चितच काम करीत नसतील, ते देखील पगारावर काम करतात. म्हणजे तिथे उभे असलेले गार्ड देखील या मंदिर परिसंस्थेचे लाभार्थी झालेच ना.
  • आता आपण देवाच्या गाभाऱ्यापर्यंत येतो. गाभाऱ्यात आपल्याला पुजारी दिसतात, त्यांच्या हाती आपण देवाला अर्पण करायला आणलेल्या वस्तू, पान-फुले देतो. नमस्कार करतो आणि पुढे निघून जातो आणि कळत ना काळात आपण प्रसादाचे पेढे ज्या पाकिटतात आणले होते, ते खाली टाकून देतो. आता इथे काम सुरु होते ते सफाई कर्मचाऱ्याचे. जो देखील पगारावर काम करत असतो. म्हणजे हाही झाला मंदिराचा लाभार्थी.
  • मंदिरात पुढे टेबल मांडून अजून काही लोक बसलेले असतात देणगीच्या पावत्या व कागदपत्र घेऊन. ज्यांची इच्छा असते ते देतात,ज्यांची नसते ते नाही देत. आता दिलेल्या देणगीतून गार्ड,सफाई कर्मचारी,आतमध्ये बसलेला पुजारी,त्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करायला लागणार खर्च,आजूबाजूच्या छोट्या मोठ्या मंदिरांची देखरेख,भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद याचा विचार होतो.
  • आपण दर्शन करून पुढे येतो,आपण आपली चप्पल घेतो,बाहेर पडतो. बाहेर पडल्यावर तासनतास थांबल्यामुळे भूक लागलेली असते आणि मग आपण मंदिराच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये बसून खातो, चहापाणी घेतो. म्हणजे तो हॉटेल मालक सुद्धा या मंदिर परिसंस्थेचा लाभार्थी झाला.
  • गाडी पार्किंग वाला,फळ,प्रसाद,वस्तू विकणारे,चपरासी,गार्ड,पुजारी,सफाई कर्मचारी,मंदिराचा जीर्णोद्धार करणारा गवंडी आणि त्याचे सहकारी,गंध लावणारे मुलं,आणि हॉटेल मालक ! म्हणजे मंदिराचा लाभ हा सगळ्या लोकांना होतो ना, असा सवालही यात व्यक्त केला गेला आहे आणि फक्त एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या देवस्थानांनी विविध प्रकारची मदत केली आहे, असाही आवर्जून उल्लेख या पोस्टमध्ये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post