दिवाळीतही मंदिरांना राहणार टाळे; चित्रपटगृहेही आणखी महिनाभर बंद

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'मदिरालये सुरू, पण मंदिरे बंद'...असे नारे देत भाजपने मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने केली असली व त्यात भाविकांसह हिंदुत्ववादी संघटनांनाही सहभागी करवून घेतले असले तरी त्यांच्या या 'आंदोलन मात्रे'चा राज्य सरकारवर परिणाम झालेला नाही. राज्यातील मंदिरांना दिवाळीपर्यंतच नव्हे तर आणखी महिनाभर टाळे कायम राहणार आहे. याशिवाय चित्रपटगृहेही महिनाभर बंद राहणार आहेत.

राज्यातील करोना स्थिती काहीशी आटोक्यात आली असली आणि विरोधकांनी कितीही दबाव टाकला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील धार्मिक स्थळे आणखी महिनाभर बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टाळेबंदी शिथिलीकरणांतर्गत देण्यात आलेल्या सवलती आणि लागू असलेले निर्बंध आणखी महिनाभर कायम ठेवण्यात येणार असल्याने शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे आणखी काही दिवसांसाठी बंदच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यातील करोनास्थिती सध्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दररोज बाधितांची संख्या कमी, तर या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी राज्यातील करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सिनेमागृहे पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या वादानंतर राज्य सरकार धार्मिक स्थळांबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांची उत्सुकता होती. मात्र मिशन बिगीन अगेन उपक्रमाअंतर्गत गेले महिनाभर लागू करण्यात आलेली मार्गदर्शक नियमावली नोव्हेंबर महिन्यातही कायम ठेवण्याचा म्हणजेच आणखी महिनाभर टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळे आणखी महिनाभर बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याआधी राज्यात ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे, फूड कोर्ट आणि मद्यालये (बार) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हीच नियमावली कायम राहील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थामध्ये ऑनलाइन शिक्षण तसेच अन्य कामांसाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यास परवानगी देण्यात आली असली तरी शाळा- महाविद्यालये आणखी महिनाभर बंदच राहणार आहेत. दिवाळीपूर्वी चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी ती कधी सुरू होणार याबाबत नव्या आदेशात स्पष्टता नसल्याने चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. तरणतलाव, नाटय़गृहे, सभागृहे तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सोहळ्यावरील बंदी आणखी महिनाभर कायम राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post