केसांसाठी पोषक आहे 'ही' चटणी!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कढीलिंब हे सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. कढी, पोहे, चिवडा म्हटले की, पहिले आठवते, ते गोडलिंबाचे पान. कढीलिंबाशिवाय पोह्यात, चिवड्यात मजाच नाही बाई! असे बऱ्याच महिला म्हणतात. असो! पण महिलांचा विषय निघाला की, केसांचा विषय हा निघतोच निघतो. माझ्या केसांना वाढच नाही किंवा माझे केस दिवसेंदिवस पातळ का होत आहेत? माझे केस फारच गळतात, हा प्रत्येक स्त्रियांचा यक्ष प्रश्न..!

कढीलिंबाचे उत्पत्ती स्थान भारत आणि श्रीलंकेत.. परंतु भारतात केरळ, बिहार, तामिळनाडू व हिमालयात मोठ्याप्रमाणात कढीलिंबाची झाडे आढळून येतात. कढीलिंबाची पाने फार रुचकर असतात आणि त्यामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर असते. आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये औषधी गुण असतातच! त्यातिलाच एक आहे कढीलिंब. हिंगाच्या फोडणीमध्ये जर, कढीलिंबाची पानं टाकली की, कढी, पोहे, विविध प्रकारच्या भाज्या चविष्ट बनतात.

कढिलिंबाच्या पानात 66.3% आर्द्रता, 6.1% प्रोटीन, 1% चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4% फायबर, 4.2% खनिज असते. कढिलिंबाच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.

मधुमेही रुग्णाने नियमित सकाळी कढी पत्ता खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. केसांची समस्या असेल किंवा केस गळत असल्यास, केस रुक्ष असतील, तर कढीलिंब रोजच्या आहारात सामील करावा. कढीलिंब खायला आवडत नसल्यास त्याची चटणी करुन ठेवावी व नियमित रोजच्या जेवणात चटणीचे सेवन करावे. यात लोह तत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.

कशी करायची कढीलिंबाची चटणी?

साहित्य
1) एक पाव कढीलिंबाची पान
2) एक चमचा तेल
3) एक चमचा फुटाणे
4) चवीपुरते मीठ
5) मिरी पूड आवडत असल्यास टाकावी किंवा लाल मिर्ची पावडर अगदी चिमूट भर टाकावी.

कृती
सर्वप्रथम कढीलिंबाची पान धुवून स्वच्छ करावी. थोडावेळ एका स्वच्छ फडक्यावर सुकवून घ्यावी आणि मग कढईत थोडे एक चमचा तेल टाकून परतावी, आणि खरपूस भाजून घ्यावी.
पान थंड झाल्यावर वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मधून बारीक करावे. झाली चटणी तयार..

कढीलिंब सर्वत्र आढळून येणारी वनस्पती असल्यामुळे आपण तिचे रोज सेवन करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर केस लांबसडक हवे असतील, तर नियमित सेवन करा. केसांच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी अशी ही कढीलिंब चटणी आहे.

महत्वाचे

लांब आणि दाट केसांसाठी

1) कढिलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ती दह्यामध्ये मिसळून केसांना लावल्यास, केसातील कोंडा होण्याची समस्या दूर होते व केस गळणे थांबते.

2) कढीलिंबाची पाने उकळून, पाणी कोमट झाल्यावर त्यात चमचा भर मध टाकून नियमित पिल्यास केस काळे आणि दाट होण्यास मदत होते.

3) डोक्यात वारंवार खाज येत असेल तर कढीपत्ताची पान, कापूर, खोबरेल तेलात मिसळून त्या तेलाने डोक्याची मालिश करावी. 

4) केस रुक्ष असतील तर डोक्यात खाज येते. त्यासाठी २०० ग्रॅम खोबरेल तेलात २ छोटे मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धा पाव कढीपत्त्याची पाने बारीक करुन तेलात उकळून घेणे. कांदा आणि कढीपत्ता काळा होईस्तोवर उकळून घेऊन मग ते तेल गाळून घेऊन एका स्वच्छ बॉटल मधे भरून घेऊन आठवड्यातून 2 वेळा डोक्याची मालिश करावी. 


- डॉ. शुभदा शिंगणे
ईमेल - miki3330@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post