महाविकास आघाडी सरकारकडून जिल्हा-तालुका प्रशासनात मोठे फेरबदल


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : सत्तांतरानंतर पहिल्या सहा-सात महिन्यांत राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या केल्यानंतर राज्यभरातील ग्रामीण भागातील प्रशासनावर पकड बसवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अशा जिल्हांतर्गत प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फे रबदल करत सुमारे पावणेदोनशे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

सत्तांतरानंतर प्रशासकीय बदल्या या नेहमीचीच बाब असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व म्हाडा, सिडको यासारख्या प्रमुख सरकारी उपक्रमांच्या प्रमुखपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर करोनाच्या निमित्ताने महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या सर्व वेळी मागील भाजप सरकारच्या काळात मोक्याच्या ठिकाणी बसलेले अधिकारी हलवण्यात आले. यानंतर आता राज्याच्या ग्रामीण भागात सरकारचा चेहरा-मोहरा म्हणून वावरणाऱ्या जिल्हांतर्गत प्रशासनात राज्यभर मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी या पदांवरील अधिकारी मंडळी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. भाजप सरकारच्या काळात नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आपल्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करत प्रशासनाचा चेहरा-मोहरा नव्या सरकारला हवा तसा असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. या बदल्यांना विनंती बदल्या असे गोंडस नाव देत त्यावरून राजकीय आरोपांना फारशी जागा उरणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.


  • राज्यातील सर्व प्रशासकीय विभागनिहाय बदल्या करण्यात आल्या असून त्यात तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • पुणे विभागात २२ तहसीलदारांच्या तर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
  • नाशिक विभागातील १८ तहसीलदारांच्या तर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४ चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
  • अमरावती विभागात १७ तहसीलदारांच्या तर ९ उपजिल्हाधिकारी - उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
  • मराठवाडय़ातील २३ उपजिल्हाधिकारी-उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तर २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 
  • नागपूर विभागातील १६ तहसीलदारांच्या तर ४ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 
  • कोकण विभागात ८ तहसीलदारांच्या तर ७ उपजिल्हाधिकारी-उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
  • जवळपास १६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सात-आठ जणांना मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post