हळदीचे प्रकार अन् 'हे' फायदे जाणून घ्या!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

प्राचीन काळापासून घरगुती उपचार म्हणून हळदीचा उपयोग आपण करत आहोत. तसेच रोजच्या जेवणात तर तिचा सर्रास वापर होतोच. सर्व प्रकारच्या भाज्या म्हणा किंवा विविध पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीचे प्रकार आणि त्याचे काही फायदे जाणून घेऊयात..

हळदी मध्ये साधारण 2 किंवा 3 प्रकार आढळून येतात. आंबे हळद, लोखंडी हळद आणि आपण रोज वापरतो ती सुगंधी हळद. लोखंडी हळद ही साधारणत: रंग बनविण्यासाठी वापरली जाते. आंबे हळद ही अनेक व्याधी, आजारांवर घरगुती उपचारासाठी उपयोगात आणली जाते. सुगंधी हळद ही अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. तिन्ही प्रकृतीच्या लोकांना म्हणजे वात, पित्त आणि कफ प्रकृतीच्या रुग्णांना हळद औषध म्हणून देता येते. 

हळदीचे रोप साधारणत: 2 ते 3 फुटापर्यंत असते. त्याची पाने केळीच्या पानांसारखी असतात. या पानांना सुद्धा हळदीचा सुगंध असतो. हळद रुक्ष, कडवट, तिखट आणि गरम असून त्वचा उजळण्यास मदत होते.

दक्षिण भारतात हळदीच्या पानांचा उपयोग विविध पदार्थ बनवताना केला जातो. त्यामुळे पदार्थ सुगंधी बनतो. एक हलकासा सुगंध पदार्थाची चव वाढवतो. जसे की इडली बनवताना, इडिअप्पम आणि पातोडी बनवताना हळदीच्या पानांचा उपयोग करतात.

हळद जंतुनाशक, दुर्गंधीहारक, विषहारक असल्यामुळे तिचा उपयोग पोटातून घेण्याबरोबरच बाहेरून त्वचेला किंवा त्वचा विकारात जसे की कंड सुटणे, रक्ताच्या गाठी, सूज, मुका मार, जखम, खरचटणे, सडलेले वर्ण इत्यादी विकारावर केेला जातो. हळदीचा लेप किंवा पोटीस बांधून विकार बरे होतात. हळद वातशामक असल्यामुळे वातनाडीच्या दुखण्यावरही हळदीचा उपयोग केला जातो.

हळदीचे विविध उपयोग

1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद याचा लेप चेहऱ्यावर आठवड्यातून दोन वेळा लावल्यास चेहऱ्याची ढिली झालेली त्वचा, सुरकुत्या दूर होतात.

1 चमचा टोमॅटोचा रस आणि चिमूटभर हळद घेऊन चेहऱ्यावर लावल्याने मुरूम येणे कायमचे बंद होते आणि मुरुमाचे काळे डाग नष्ट होतात.

हिवाळ्यात अंगदुखीच्या तक्रारी असतात. हात पाय जखडतात, पाठ दुखते. त्यासाठी रोज रात्री गरम दुधात हळद आणि सुंठ एकत्र करुन पिल्यास 15 दिवसात बरे वाटू लागते.

हळद आणि मध एकत्र करुन टॉन्सिल्सवर लावल्यास टॉन्सिल्स बरे होतात.

गरम दुधात हळद आणि तूप घालून पिल्यास कोरडा खोकला बरा होतो. तसेच सर्दी कफ या विकारांवर हळद अत्यंत गुणकारी आहे.

खरचटले असल्यास किंवा त्वचेतून रक्त वाहत असल्यात प्राथमिक उपचार म्हणून हळद लावल्यास होणारा रक्त्तस्त्राव बंद होतो. 

कोरफडीच्या गरात हळद टाकुन लेप लावल्यास स्तन विकार दूर होतात. जसे स्तनावर सूज असेल किंवा मासिक पाळीत स्तन दुखत असल्यास या लेपाने बराच आराम मिळतो. 

हळदीचा धूर करुन तो हुंगल्यास सर्दी दूर होते.

हळद आणि लसूण पाकळ्या हुंगल्यास कफ बाहेर पडण्यास मदत होते.

बकरीच्या दुधात हळद घालून पिल्यास बद्धकोष्ट्ता दूर होते.

हळद आणि गूळ ताकात एकत्र घेतल्यास मुतखड्याचा
त्रास कमी होण्यास फायदा होतो.

- डॉ. शुभदा शिंगणे
ईमेल - miki3330@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post