मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये काल जो गोंधळ उडाला तो सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे झाला होता. बहिस्थ परिक्षार्थींची संख्या 9 हजार असताना अडीच लाख जणांनी त्यावर लॉग इन केल्याचे दिसत होते. हा सायबर हल्ला असून यंत्रणा कोलमडून टाकण्याचा प्रयत्न होता़. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने पोलीसांकडे तक्रार केली असून अनेक तज्ञ मंडळी याचा शोध घेऊन मुळापर्यंत जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.

पुढे उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु करणार आहोत. जिल्हा रुग्णालयात सुरु होणारे हे राज्यातले पहिले सेंटर ठरेल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही आम्ही ऑक्सीजन प्लान्ट बसवणार आहोत. कोवीड रुग्णांना जी ऑक्सीजनची गरज असते तीच ऑक्सीजनची गरज अन्य रुग्णांनाही असते. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन प्लॅन्टचा उपयोग होऊ शकतो असे मत सामंत यांनी व्यक्त केले़.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनातून बरे होणार्‍यांची संख्या वाढली आहे़. जिल्ह्यात 6,800 रुग्ण बरे झाले आहेत़. सध्या 800 रुग्ण उपचार घेत आहेत़. बरे होण्याचे प्रमाण 87.52 टक्के आहे़. मृत्यूचा दर वाढला असून तो कमी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले़.

Post a Comment

Previous Post Next Post