'राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही'

  

एएमसी मिरर वेब टीम
पुणे :
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार अनेक पावलं उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून, कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, पुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यावेळी उपस्थित होते.

डेव्हलपमेंट शुल्क घेऊ नये
कोरोनामुळे महाविद्यालय सुरू होणार नाहीत, अशा वेळी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क घ्यावे. डेव्हलपमेंट शुल्क, जिमखाना असे शुल्क स्वीकारू नये. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क वसूल करत असतील तर त्यांची तक्रार करावी, अशा संस्थांवर कारवाई केली जाईल. तसेच महाविद्यालयांनी शुल्कवाढ करू नये, याबाबत निर्देश दिले आहेत. पुणे विद्यापीठानेही प्रस्तावित केलेली शुल्कवाढ एका वर्षासाठी स्थगित केली आहे त्यामुळे संस्थांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करू, असेही सामंत यांनी सांगितले.

‘सीएचबी’साठी नेट-सेट प्राध्यापकांना प्राधान्य
महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर (सीएचबी) प्राध्यापक नियुक्ती केली जाते. कोरोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली, त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनदेखील या नियुक्त्या रखडल्या होत्या. शासनाने ही बंदी उठवावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतला असून, भरतीसाठी लवकरच जाहिरात काढली जाईल. यामध्ये संबंधित विषयांच्या सेट-नेट पात्र प्राध्यापकांना प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार केला जाईल. प्राध्यापकांच्या भरतीसंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात भरती बंदीमधून प्राध्यापकांना वगळावे, अशी मागणी केली आहे. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य शासनाने यापूर्वी 40 टक्के रिक्त जागा भरण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे ही कोंडी सुटेल, असे सामंत यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post