खडसे म्हणतात, दोन दिवस वाट बघा, मंगळवारी सांगतो..!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
 
भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रविवारी समाजमाध्यमावर पसरली होती. मात्र, मी अजून भाजपातच आहे. असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाही. त्यामुळे माझी अधिकृत भूमिका जाणून घ्यायची असल्यास दोन दिवस वाट बघा, मंगळवारी सांगतो, असा 
निरोप खडसे यांनी समर्थकांमार्फत माध्यमांना पाठविला आहे. 

भाजपात नाराज असलेले एकनाथराव खडसे राष्ट्रवादीमध्ये जात असल्याचा व त्यांचा प्रवेश निश्चित असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. स्वत: खडसे मात्र या विषयावर काहीही बोलायला तयार नसल्याने आणखीनच संभ्रम वाढला आहे. खडसे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र असे काहीही घडले नाही. घटस्थापनेचा मुहूर्त हुकल्यानंतर आता खडसे हेे दसऱ्याला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून ते गुरुवारी राष्ट्रवादीमध्ये जातील, अशी बातमी रविवारी झळकली. त्यामुळे जळगावातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यावर समर्थकांनी गर्दी केली होती.

मात्र, मी कोणताही राजीनामा दिलेला नसून मला अधिकृत काही सांगायचे असल्यास दोन दिवस वाट बघा, मंगळवारी मी बोलेन, असा खडसे यांचा प्रसारमाध्यमांसाठी निरोप असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याबाबत रविवारी प्रसारित झालेली माहिती अफवाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post