'शेतकऱ्यांची जमीन आणि पैशांसाठी हा खेळ चालला आहे'

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे काँग्रेस सत्तेत आल्यास रद्द करु, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील जनतेला दिले आहे. पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या शेती वाचवा यात्रेत ते बोलत होते.

इथल्या शेतकऱ्यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ.” या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे.


हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. जेव्हा यांना पाहिजे तेव्हा ते शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमीनीचं रक्षण केलं. बाजारा मुल्यापेक्षा चारपट जास्त भाव दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकऱ्यांच्या जमीनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मुठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकारने ती संपवू पाहत आहे. मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिकाही राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post