रक्ताचा रंग लाल का असतो? जाणून घ्या..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपले रक्‍त निळे, पिवळे, हिरवे किंवा इतर रंगाचे का नसते. त्‍याचा रंग लालच का असतो? तुम्‍हालाही हा प्रश्‍न कधीना कधी पडलाच असेल. पण रक्त लाल का असते, हे जाणून घेण्यापूर्वी आपण रक्त म्हणजे काय, त्यात कोणती घटक असतात, ते पासून बनते हे थोडक्यात जाणून घेऊया...

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (1.3 गॅलन) रक्त असते. रक्त हे लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्‍या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेले असते. प्रत्‍येकाचे कार्य वेगवेगळे आहे. रक्‍त एक गुंतागुंतीची रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.

मानवी रक्त ज्या पेशींपासून बनलेले असते, त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे या पेशींना लाल रक्त पेशी (Red Blood Cells) असे म्हणतात. पण त्या पेशी लाल का असतात? किंवा लाल कशामुळे होतात? ते आपण जाणून घेऊया...

मानवी रक्तामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण सर्वाधिक असते, शिवाय लाल रक्त पेशी या विशिष्ट अशा प्रथिनांपासून बनलेल्या असतात. त्यांना ‘हिमोग्लोबिन (Hb)’ असे म्हणतात. प्रत्येक हिमोग्लोबिन हे अनेक उपभागांनी मिळून बनलेले असते, त्यांना ‘हिम्स’ (Hemes) असे म्हणतात. हे हिम्स लोहयुक्त धातूने बनलेले असतात. रक्त जेव्हा फुफ्फुसात जाते तेव्हा रक्तात ऑक्सिजन मिसळला जातो. जेव्हा ऑक्सिजन आणि लोह धातू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते व लोहयुक्त धातूचा रंग लाल होतो. (जेव्हा लोह धातूचा ऑक्सिजनशी संबंध येवून लोह गंजण्याची क्रिया होते तेव्हासुद्धा लोह धातूचा रंग लालसर पडतो). रक्तातील लोह जेव्हा deoxygenated (ऑक्सिजन काढून घेण्याची क्रिया) होते, तेव्हा ते आणखीनच गडद लाल रंगाचे बनते. या कारणांमुळेच हिम्स लाल होते, हिम्समुळे हिमोग्लोबिन लाल रंगाचे होते व हिमोग्लोबिनमुळे आपले रक्त लाल रंगाचे दिसते.

'(कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही)

Post a Comment

Previous Post Next Post