यंदा ‘ऑक्टोबर हीट’ची हूल, थेट थंडीची चाहूल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

उन्हाचा चटका आणि अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’ला वगळून यंदा थंडीची चाहूल लागली आहे. संपूर्ण ऑक्टोबर ढगाळ वातावरण आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे यंदा हा बदल जाणवला आहे.

राज्यात आता सर्वदूर कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यातच उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्यांचे प्रवाहही सुरू झाले आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढत जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाच्या हंगामातील चार महिन्यांचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबरच्या साधारणत: दुसऱ्या आठवडय़ानंतर ढगाळ स्थिती दूर होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतो. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस किंवा त्यापुढेही जातो. हा कालावधी ‘ऑक्टोबर हीट’ म्हणून परिचित आहे.

जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा मुख्य कालावधी संपल्यानंतर राज्यात ढगाळ स्थिती कायम होती. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाला आणि त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ७५ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही थांबला होता. कमी दाब क्षेत्राचा प्रभाव ओसरल्यानंतर हा प्रवास सुरू होऊन २८ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह देशातून मोसमी वारे निघून गेले. त्यामुळे ढगाळ स्थिती निवळून हवामान कोरडे झाले. तोवर ऑक्टोबर महिना सरत आला आणि उत्तरेकडून थंड वारेही सुरू झाले. परिणामी ऑक्टोबर हीट वगळून राज्याला थंडीची चाहूल लागली.

हंगामाच्या पावसाची समाप्ती आणि थंडीची चाहूल लागण्याच्या कालावधीतील ‘ऑक्टोबर हीट’चा कालावधी यंदा निर्माण झालाच नाही. लांबलेला पाऊस आणि ढगाळ हवामानाची स्थिती ही कारणे त्यासाठी सांगितली जात आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट नोंदविली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post