महिलांवरील वाढते अत्याचार.. महाराष्ट्राची माहिती सर्वांसाठी खुली होणारएएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर :
देशभरात महिला व युवतींवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची स्थिती काय आहे, याची माहिती लवकरच सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील महिलांच्या अत्याचारासंदर्भातील बैठक नुकतीच मुंबईत झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह खासदार सुळे तसेच राज्यातील महिला लोकप्रतिनिधी, विविध महिला संघटनांचे प्रमुख आणि आमदार उपस्थित होते. 'महाराष्ट्र महिला अत्याचारात नेमका कुठे आहे, याचा डेटा सर्वांसाठी खुला' करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्यासंदर्भात नेमके कुठे आहे, येथे अत्याचाराचे प्रमाण किती आहे याची सर्व आकडेवारी माध्यम आणि लोकप्रतिनिधींच्या समोर ठेवली जाणार असल्याची माहिती खासदार सुळे यांनी दिली.

या बैठकीमध्ये राज्यात मागील वर्षांमध्ये महिलांवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचाराच्या संदर्भातील माहिती आणि त्याचा डेटा गृह विभागाकडून लोकप्रतिनिधींना देण्यात आला. हा लेखाजोखा माध्यमांसमोर आणि तसेच राज्यातील नागरिकांना पाहता येईल अशा प्रकारे ठेवला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तो डेटा लवकरच सर्वांना पाहता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post