अबब.. 'या' शहरात २० कोटींचे ड्रग्ज जप्त

 

एएमसी मिरर वेब टीम
पुणे :
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाशी याचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठन जि. पुणे), आनंदगीर मधूगीर गोसावी (वय २५, रा. रुखईखेडा, जळगाव), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, जि. पुणे), संजीवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. झारखंड (सध्या नोएडा), तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम (वय ३१, रा.बिहार (सध्या नोएडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी चाकण परिसरातील शेलारवाडी येथे अज्ञात मोटारीचा सिनेस्टाइल पाठलाग करून या आरोपीना पकडले आहे. त्यांची झडती घेतल्यानंतर प्रत्येकाच्या बॅगेत एकूण २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन ड्रग्ज आढळून आले.

आरोपींकडे चौकशी केल्यानंतर यातील संजीवकुमार राऊत आणि तौसिफ तस्लिम हे नोएडा येथून विमानाने पुण्यात आले होते. त्यानंतर पाचही आरोपी एकत्र आले आणि २० किलो मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी निघाले होते. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना अटक केली. हे आरोपी ज्या केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला होते तिथे हे मेफेड्रोन ड्रग्ज बनवले जात होते, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. या प्रकरणाचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post