नारळ पाण्यापासून ते नारळाच्या तेलापर्यंत जाणून घ्या १६ आरोग्यदायी फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतीय समाजामध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी श्रीगणेश पूजेनंतर शेंडीवाल्या नारळाची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र, युगानुयुगे चालू आहे. कोणाही थोर व्यक्तीचा सत्कार करावयाचा झाल्यास नारळाशिवाय सत्कार होत नाही. याउलट मराठी भाषेची एक गंमत नारळासंबंधी काही औरच सत्य सांगते. एखाद्या उद्योगधंद्यात वा कार्यालयात एखाद्या व्यक्तीचे काम असमाधानकारक असल्यास त्याला काढून टाकण्याच्या प्रकारालाही ‘नारळ देणे’ असाच अर्थ अपेक्षित आहे.

जगभर सर्वमान्य असलेला ‘देवाची करणी, नारळात पाणी’ असा नारळ आपल्या अनेकविध आरोग्य समस्यांचा ‘हल’ खात्रीने करतो. आमच्या मायबहिणींच्या रोजच्या स्वयंपाकात ओल्या नारळाचे खोबरे किंवा गोटा खोबऱ्याचे सुके खोबरे नाही, असे कोणत्याच स्वयंपाकघरात घडत नाही. एके काळी आपल्या समाजात अशी समजूत होती की, नारळ-माडाची लागवड फक्त समुद्रपट्टीतच होते, पण ही समजूत खोटी ठरवणारी नारळाची झाडे पुणे शहरातील अनेक सोसायटय़ांत खूप उंच वाढलेली आपण नेहमीच पाहतो. मलबार, कोकण व केरळामध्ये नारळाच्या झाडावर सरसर चढून नारळ काढण्यासाठी खूप मागणी असते.

१) माड किंवा नारळाचे सर्वच भाग उपयोगी पडतात. पूर्वी अनेक गावांमध्ये नारळाच्या झाडाच्या झावळय़ा घरांचे छप्पर शाकारण्यासाठी वापरल्या जात असत.

२) जुनं पण ताजे नारळाचे खोबरेल तेल काढण्याचा मोठा व्यावसाय दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आहे. या तेलात गंधयुक्त द्रव्य आणि आम्लता असते, पण आपण आपल्या घरी नारळाचे खोबरे खवून; ‘लोणी कढवून जसे तूप करतो’ असे नारिकेल तेल तयार केल्यास त्यात किंचितही आम्लता नसते. अशा ताज्या नारिकेल तेलात तुपाइतकेच अनेकानेक शरीरपोषक गुण असतात.

३) नारळापासून काढलेल्या तेलाचा उत्तम दर्जाचा साबण दक्षिणेत खूप लोकप्रिय असतो.

४) नारळाच्या कवटीपासून जाळून काढलेले तेल अनेकानेक त्वचाविकारांवर उपयुक्त आहे. पूर्वी पुण्याच्या मंडईमध्ये पावगी नावाच्या महिला अशा तेलाची खूप विक्री करीत असत. त्यासाठी त्या स्वत: भरपूर श्रम घेत. नारळाचे तेल केश्य, कृमिघ्न, व्रणरोपण, श्लेश्मघ्न, शोषघ्न व कर्षण आहे.

५) आपणा सर्वाना शहाळ्याचे पाणी पिण्याची खूप आवड असते. ते शीतल, मूत्रजनन, मूत्रविरजनीय व पिपासाघ्न आहे. महिलांनी गरोदरपणी नियमित ओल्या नारळाचे खोबरे खाल्ल्यास जन्माला येणारे बाळ गोरेपान व कांतीवान असते, असा सार्थ सार्वत्रिक समज आहे.

६) जून नारळाचा अंगरस खोकला, क्षय व अशक्तपणा दूर होण्यासाठी देतात. त्याने कब्ज मोडतो.

७) दक्षिणेतील मलबार प्रदेशात नारळापासून अति चविष्ट गूळ बनवण्यात येतो.

८) ज्यांचे केस अकाली गेले आहेत, त्यांनी घरी केलेले नारिकेल तेल, पोटात घेण्यासाठी व केसांना लावण्यासाठी वापरल्यास महिना-दीड महिन्यात उत्तम केस येतात. असा अनेक टक्कल पडलेल्या मंडळींचा अनुभव आहे.

९) घरगुती नारिकेल तेल कॉडलिव्हर ऑइलपेक्षा खूप चांगले काम देते. त्यासाठी क्षयी व्यक्तींनी ओले खोबरे खावे आणि ताजे तेलही प्यावे.

१०) खूप अवघड शस्त्रक्रियेच्या आधी व नंतरही कोवळय़ा नारळाचे दूध दिल्यास शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडते.

११) खूप श्रमाचे काम करणाऱ्या महिलांनी ओले किंवा कोरडे खोबरे खाल्ल्यास त्या आपली गमावलेली ताकद लगेच कमावतात.

१२) नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते, ते काही चुकीचे नाही. ओला नारळ, सुखे खोबरे, नारळपाणी, नारळाचे दूध, नारळाचे तेल आणि तूप उपयुक्त आहे. एवढेच नव्हे तर नारळाची शेंडी आणि करवंटीसुद्धा उपयोगी आहे.

१३) अंगाची आग होणे, विष्ठा किंवा थुंकीतून रक्त पडत असेल तर ओले खोबरे, काळा मनुका किंवा खडीसाखरेसोबत चघळून खावे.

१४) गळ्यात खवखवून खोकला येत असेल किंवा तहानेने घशाला शोष पडत असेल तर ओला नारळ चावून खावा.

१५) खोबरे हे बलवर्धन आहे. अशक्त माणसांनी खडीसाखरेसोबत खावे. (त्याने थोडा मलावरोध होतो. त्यामुळे औषधी उपयोग करताना काळय़ा मनुकांबरोबर खावे.) पुरुषांमधील वंध्यत्वात शुक्राणूवृद्धीसाठी हा प्रयोग अवश्य करून पाहावा.

१६) पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post