एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
कोरोना काळामुळे खासगी शाळांतील मुलांना सध्या घरबसल्या शिक्षकांचे मार्गदर्शन ऑनलाईन मिळत असताना आता ही सुविधा महापालिकेच्या चार शाळांतील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध झाली आहे. येथील निर्मिक फाउंडेशनने या मुलांसाठी ई-लर्निंग सुविधा दिल्याने मनपाच्या चार शाळांतील २६४ मुलांना त्यांचे शिक्षक ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन करीत आहेत. येत्या काही दिवसातच मनपाच्या अन्य ८ शाळांनाही असे साहित्य निर्मिक संस्थेद्वारे उपलब्ध होणार असल्याने सर्व शाळांतून ई-लर्निंग या आधुनिक प्रणालीद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवणार आहेत.
मनपाच्या केडगाव येथील ओंकारनगर या पहिल्या 'आयएसओ' शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांच्या पाठपुराव्यामुळे निर्मिक फाउंडेशनद्वारे मनपाच्या चार शाळांतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य उपलब्ध झाले आहे. मनपाच्या ओंकारनगर (विद्यार्थी संख्या ७९), सावेडी शाळा (१०५), भुतकरवाडी शाळा (४२) व सर्जेपुरा ऊर्दू शाळा (३८) अशा २६४ विद्यार्थ्यांसाठी ४ प्रोजेक्टर,४ प्रोजेक्टर स्क्रीन,४ साउंड,४ इंटरनेट डोंगल,४ अभ्यासक्रमाचे पेन ड्राईव्ह, ४ माऊस, ४ प्रोजेक्टर स्टॅण्ड दिले गेले आहेत. या माध्यमातून ओंकारनगर शाळा झुम ॲपवर रोज ऑनलाईन क्लास घेत आहे तसेच या चारही शाळा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण पद्धती राबवत आहे. सर्व शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या साहित्याचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक कबाडी यांनी व्यक्त केला. निर्मिक फाउंडेशन मनपाच्या सर्व १२ शाळांना हे साहित्य देणार आहे. आणखी तीन महिन्यांच्या टप्प्या-टप्प्याने राहिलेल्या ८ शाळांना हे प्रत्येकी ३६ हजार रुपये किमतीचे साहित्य मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्साहात साहित्य वाटप
निर्मिक फाउंडेशन महाराष्ट्रच्यावतीने पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या चार शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप नुकतेच उत्साहात झाले. निर्मिक फाउंडेशनचे विश्वस्त राहुल भोसले, सचिव अभिजीत अनाप, खजिनदार शेखर आंधळे, विश्वस्त नरेंद्र डापसे, सचिन कराळे यांच्यासह मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, डॉ.कुणाल कोल्हे, बांधकाम व्यावसायिक सुरेश वारुळे, एलआयसी विकास अधिकारी तुषार देशमुख उपस्थित होते. फाउंडेशनने मनपाच्या महात्मा फुले विद्यालय (सावेडी), मनपा शाळा ओंकारनगर (केडगाव), श्रीछत्रपती शिवाजी महाराज विद्यालय (भुतकरवाडी) व हवालदार शहीद अब्दुल हमीद उर्दू शाळा (सर्जेपुरा) या शाळांना ई-लर्निंग साहित्य देण्यात आले. यावेळी मनपा शाळांचे मुख्याध्यापक छाया गोरे,अक्षय सातपुते,विजय घिगे,शशिकांत वाघुलकर,समिना खान, मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्ष मनीषा शिंदे, उपाध्यक्ष ज्योती गहिले, खजिनदार भारती कवडे उपस्थित होत्या. मनपाच्यावतीने प्रशासनाधिकारी पवार यांनी निर्मिक फाउंडेशनच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मनपा शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी वंचित घटकातील आहेत. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे, त्यामुळे या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्य़ासाठी आवश्यक मदत नेहमी केली जाईल, अशी ग्वाही फाउंडेशनचे सचिव अनाप यांनी दिली.
Post a Comment