नगरमध्ये साकारला वीर तानाजीचा कोंढाणा.. इतिहास प्रेमीच्या कौशल्याला मिळतेय दाद

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'गड आला, पण सिंह गेला'...असे शिवछत्रपतींचे प्रसिद्ध वाक्य ज्या किल्ल्यासंदर्भात होते व जो किल्ला जिंकण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरेंनी प्राणांचे बलिदान दिले...तो कोंढाणा (सिंहगड) किल्ला नगरमधील इतिहास प्रेमी ठाकूरदास परदेशी यांनी हुबेहूब साकारला असून, तो पाहण्यासाठी सारसनगर परिसरातील त्यांच्या घरी इतिहास प्रेंमींची गर्दी होत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ही कोंढाणा (सिंहगड) किल्ला प्रतिकृती सर्वांना पाहण्यासाठी खुली असणार आहे.

नगर येथील पंडित नेहरू हिंदी विद्यालयात कनिष्ठ लिपिक असलेल्या ठाकूरदास परदेशी यांना इतिहासाचे वेड आहे. शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी ते घरी नसतात तर कोठेतरी दुर्गभ्रमंतीत रमलेले असतात. मागील १५-१६ वर्षात त्यांनी राज्यातील १७५हून अधिक गड-किल्ले पाहिले आहेत व त्यांची छायाचित्रेही काढताना माहितीही संकलित केली आहे. स्वतःच्या इतिहास प्रेमाचा हा आविष्कार ते दरवर्षी एखाद्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती रेखाटून करतात. आतापर्यंत त्यांनी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, शिवनेरी, पुरंदर, प्रतापगड, सिंधुदूर्ग अशा अनेक किल्ल्यांच्या शिल्प प्रतिकृती आपल्या घरी दिवाळीच्या सुट्टीच्या काळात केल्या आहेत. यंदा या मालिकेत त्यांनी कोंढाणा (सिंहगड) किल्ला साकारला आहे. या प्रतिकृतीचा आकार - रुंदी 10 फुट व उंची 4 फुट आहे. हा किल्ला बारदाना, शेण, माती, पुठ्ठे व विविध नैसर्गिक वस्तू वापरून तयार केला आहे. दिवाळीनिमित्त लहान मुलांना किल्ल्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पत्ता - ठाकुरदास परदेशी, शांतीकुंज, शांतीनगर पाण्याच्या टाकीजवळ, सारसनगर,अहमदनगर (मो.9860207076).

सांगितला जातो कोंढाण्याचा इतिहास
सिंहगड (कोंढाणा) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका किल्ला. पुरंदरच्या तहात तो मोगलांना दिला गेला. पण आग्र्याहून परत आल्यावर त्यांनी सर्वप्रथम सिंहगड (कोंढाणा) स्वराज्यात आणण्याचे ठरवले आणि ही अवघड कामगिरी सोपवली सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर. डोनागिरीच्या कड्याला दोर लावून मावळ्यांनी सिंहगडात प्रवेश केला. किल्ल्याचा मोगल सुभेदार उदयभान राठोड व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यात तुंबळ युध्द झाले. यात उदयभान राठोड मारला गेला व सिंहगड (कोंढाणा) स्वराज्यात आणण्यात यश मिळाले. स्वत:च्या मुलाचे लग्न असतानाही 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे' असे म्हणणारे सुभेदार तानाजी मालुसरे रणांगणात शत्रूशी लढताना धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरेंच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज 'गड आला, पण सिंह गेला' असे म्हणाले, तेव्हापासून कोंढाणाचे सिंहगड असे नाव झाले, अशी माहितीही परदेशी किल्ला प्रतिकृती पाहण्यास येणारांना सांगतात.

Post a Comment

Previous Post Next Post