राज्यपाल नियुक्त आमदार : 'या' तिघांची कदर की राजकीय खेळी?

 

श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांबाबत राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी १२ नावांची स्वतंत्र शिफारस राज्यपालांकडे करून धमाका उडवून दिला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी मंत्रिमंडळ शिफारस महत्त्वाची असते, अशा स्थितीत सदाभाऊंनी शिफारस केलेल्या नावांचा राज्यपालांकडून कितपत विचार होईल, हा उत्सुकतेचा भाग असला तरी सदाभाऊंच्या त्या यादीत नगर जिल्ह्यातील तीन नावांचा असलेला समावेश, हा त्या तिघांच्या कार्याचा सन्मान व कदर म्हणावी की, महाविकास-भाजप राजकीय कुरघोडीच्या खेळीचा परिपाक म्हणावा, असा प्रश्न आहे. मात्र, यानिमित्ताने राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नगर जिल्ह्यातही तेवढ्या ताकदीची माणसे आहेत, याचे समाधान असल्याची भावना जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे व तीच सध्या चर्चेची झाली आहे.

रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी नावे सुचवली आहेत. यात अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रवचन-कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदोरीकर, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा मूळ रहिवासी असलेला प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान, पत्रकार-लेखक अमर हबीब, देशविदेशाच्या नकाशावर झळकलेले नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारचे सर्वेसर्वा पोपटराव पवार, साहित्यिक विठ्ठल वाघ व विश्वास पाटील, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व ज्येष्ठ कलावंत मंगलाताई बनसोडे यांची नावे आमदारकीसाठी सुचवली आहेत. यावर सोशल मिडियातून टीकाटिपण्णीही सुरू आहे. सदाभाऊंनी मागच्या भाजपच्या सत्तेत स्वतः मंत्री असताना त्यावेळी ही नावे सुचवून त्यांना आमदार करण्यात पुढाकार घेतला नाही, पण आताच राज्यात भाजपविरोधी महाविकास आघाडीचे सरकार असताना ही नावे सुचवून राजकीय खेळी केल्याची चर्चा यानिमित्ताने सोशल मिडियात आहे. पण ही चर्चा व त्यामागचे राजकारण यापेक्षा नगर जिल्ह्यातील तिघांचा अशा आमदारकीसाठी विचार होणे, हेच नगरचा लौकिक वाढवणारे आहे. त्यामुळे राज्यपालांनी या तिघांना आमदार करो वा न करो, पण 'नगरच्या जनतेच्या मनातील आमदार' म्हणून पोपटराव पवार, झहीर खान व निवृत्तीमहाराज इंदोरीकर ही तीनही नावे निश्चितच असणार आहेत. अर्थात अशा 'जनतेच्या मनातील आमदार-मुख्यमंत्र्यांना' पुढे अनेक राजकीय त्रास झाल्याचा राज्याचा इतिहास आहे, तसा त्रास या तिन्ही नावांना त्यांच्या सामाजिक, क्रीडा व प्रबोधनात्मक कामात यापुढे राजकारण्यांकडून होऊ नये म्हणजे मिळवली.

तिघांचेही कर्तृत्व अफाट
पवार, खान व इंदोरीकर या तिघांचेही कर्तृत्व अफाट आहे व त्यांच्यामुळे नगर जिल्ह्याचा लौकिकही वाढलेला आहे. झहीर हा श्रीरामपूरच्या रावबहादूर बोरावके कॉलेजच्या व नगरच्या वाडियापार्क मैदानावर क्रिकेट खेळला आहे व नंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात प्रवेश करून आपल्या डावखोऱ्या मध्यमगती गोलंदाजीच्या जोरावर देशाला अनेक सामनेही जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याच्यासारखा खेळाडू विधान परिषदेत दिसणे श्रीरामपूर व नगरवासियांसाठी अभिमानाची बाब नक्कीच ठरेल. या यादीतील इंदोरीकर महाराजांचे नावही असेच अभिमानास्पद आहे. अर्थात सध्या मुलगा जन्माबद्दल त्यांनी दिलेल्या धार्मिक दाखल्याने ते सध्या वादात सापडले आहेत व न्यायालयात त्याबद्दल खटलाही सुरू आहे. पण कीर्तन व प्रवचनातून जुन्या व कालबाह्य रुढी-परंपरांवर विनोदी शैलीने ताशेरे मारून जनजागृती करण्याची त्यांची स्टाईल राज्यभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे मागच्या वर्षी उत्तर नगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांना ऑफरही होती. त्यानंतर ते एका धार्मिक दाखल्याने अडचणीत सापडले. पण राज्यपाल नियुक्त आमदार होण्याइतके समाज प्रबोधन त्यांनी केले आहे. या यादीतील तिसरे नाव असलेल्या पोपटराव पवार यांचे नाव देशविदेशात पोहोचले आहे. लोकसहभागातून हिवरे बाजार गावाचा विकास करताना गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी मागील २५-३० वर्षांपासून कृतीशील काम करणारे पोपटराव पवार राज्याच्या आदर्श गाव योजना कार्य समितीचेही अध्यक्ष आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १०० गावे आदर्श होण्याकडे वाटचाल करीत आहेत. त्यातील २५-३० गावांनी तर हे उद्दिष्ट साध्यही केले आहे. अशा स्थितीत विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पोपटरावांचा समावेश असणे हे त्यांनी ग्रामीण भागात रुजवलेल्या लोकसहभागातून जनविकास धोरणाचा सन्मान ठरणारे आहे. २००८मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक पूर्ण दिवस हिवरेबाजारला घालवला होता व लोकसहभागातून ग्रामविकासाच्या पोपटराव पवारांनी केलेल्या किमयेचे तोंडभरून कौतुकही केले होते. त्याचवेळी पोपटराव पवार राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेवर जातील, अशी जोरदार चर्चा होती, पण ती अखेरपर्यंत चर्चाच राहिली. अशा स्थितीत पुन्हा १२ वर्षांनी विधान परिषदेसारख्या आमदारकीच्या चर्चेत पोपटरावांचे नाव आले आहे. अर्थात हा भाजप व महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांचा खेळ असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे आता खोत यांनी सुचवलेल्या यादीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप होतील, पण यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील पवार, खान व इंदोरीकर यांची नावे आमदारकीच्या चर्चेत आली, हेही जिल्ह्याच्यादृष्टीने कमी नाही. राज्यात राजकीय ताकदवान असलेला नगर जिल्हा सामाजिक, क्रीडा व प्रबोधनात्मक कामातही स्वतःचा ठसा उमटवणारा आहे, हेही यातून सिद्ध झाले आहे व ते जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post