'बीसीजी'मुळे 'त्या' संसर्गाची जोखीम कमी? संशोधनाचा निष्कर्ष चर्चेत

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

क्षयरोगावर दिल्या जाणाऱ्या बॅसिलस कालमेट ग्वेरिन म्हणजेच बीसीजी लशीमुळे करोना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात म्हटले आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टिगेशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून ते सध्या चर्चेत आहे.

या संशोधनात म्हटले आहे की, सहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता हे स्पष्ट झाले, की ज्यांनी बीसीजी लस घेतली होती, त्यांच्यात करोनाचा संसर्ग दिसून आला नाही. सेडार्स-सिनाई हेल्थ सिस्टीम या संस्थेत हे संशोधन करण्यात आले. पूर्वी बीसीजी लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला असता त्यात किमान तीस टक्के व्यक्तीत कोविड १९ चाचणी सकारात्मक आली नाही. ज्यांनी बीसीजी लस घेतली नव्हती, त्यांच्यात करोनाचा संसर्ग दिसून आला. या संशोधनात संबंधित व्यक्तींना न्यूमोकॉकल व इन्फ्लुएंझा लस दिली की नाही याचा विचार करण्यात आला नाही. ज्यांनी बीसीजी लस घेतली होती, त्यांच्यात करोनाचे प्रतिपिंड कमी प्रमाणात दिसून आले, असे सहलेखक मोशे अरडिटी यांनी म्हटले आहे.

त्यांच्या मते, ज्यांना बीसीजीची लस आधीच देण्यात आली होती, त्यांच्यात करोनाने आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे. कारण, त्यांच्यात या विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती वाढलेली असावी. बीसीजी लशीमुळे नवजात बाळांमध्ये होणारा श्वसन मार्गाचा संसर्ग यातही फायदा होतो. जगातील जुन्या लशींपैकी एक असलेली ही लस करोनाला काही प्रमाणात प्रतिबंध करते, असे या संशोधनाचा आधार घेऊन आता म्हणायला हरकत नाही. मधुमेह, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी जर बीसीजी लस पूर्वी घेतलेली असेल तरी त्यांना करोनाविरोधात फायदाच झाला आहे. बीसीजी ही करोनावरची लस नाही, पण सध्याच्या परिस्थितीत बीसीजी लशीवरचा हा अभ्यास महत्त्वाचा आहे, असेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post