भाजपचे राज्यात मिशन प्रशिक्षण; श्रीगोंद्यापासून शुक्रवारी सुरुवात

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील सत्ता जाऊन विरोधी पक्षात बसावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाने आता पक्ष संघटनात्मक बांधणी हाती घेतली आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण मिशन सुरू केले गेले आहे व राज्यातील असा पहिला कार्यकर्ता प्रशिक्षण उपक्रम नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात शुक्रवारी (२० नोव्हेंबर) व शनिवारी (२१ नोव्हेंबर) होणार आहे. श्रीगोंद्यातील माऊली निवास येथे होणाऱ्या या प्रशिक्षण उपक्रमासारखे उपक्रम जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतूनही टप्प्या टप्प्याने होणार आहेत. यात कार्यकर्त्यांना तज्ज्ञांद्वारे राजकीय मार्गदर्शनासह संघटनात्मक बांधणीविषयीही माहिती दिली जाणार आहे.

श्रीगोंद्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या प्रशिक्षण मिशन उपक्रमाचे उदघाटन श्रीगोंद्याचे पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, श्रीगोंद्याचे प्रभारी राजाभाऊ लड्डा व संदीप नागवडे उपस्थित राहणार आहेत. पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचना, अंत्योदय योजना, आत्मनिर्भर भारत, व्यक्तिमत्व विकास, राज्याची राजकीय पार्श्वभूमी व भाजप भूमिका, भारताची व भाजपची विचारधारा, भाजपचा विचार परिवार, भाजपचा इतिहास व विकास, सोशल मिडियाचा उपयोग, २०१४ नंतर भारताच्या राजकारणात झालेले बदल व पक्षाचे दायित्व अशा विविध विषयांवर श्रीगोंद्याच्या प्रशिक्षण शिबिरात दिलीप भालसिंग, नितीन उदमले, अनिल लांडगे, अमर कळमकर, अॅड. राहुल जामदार, श्याम पिंपळे, दादाराम ढवाण, सुभाष गायकवाड, अंतु वारुळे व अमजद पठाण हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, शांततेच्या काळात केलेला युद्धसराव प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी यश मिळवून देतो, असे काहीसे नेहमीच्या चर्चेत असणारे वाक्य काही राजकीय पक्षही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न नेहमी करतात. कम्युनिस्ट व भाजपसारखे केडरबेस पक्ष यात आघाडीवर असतात. या पार्श्वभूमीवर आगामी मोठ्या निवडणुका अजून तीन-चार वर्षे लांब असतानाही भाजपने आतापासूनच संघटनात्मक बांधणीचे सुरू केलेले काम राजकीय विश्वात चर्चेचे झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post