बिहार निवडणूक : 'या' नगरकराने वर्तवलेला निकालाचा अंदाज जवळपास ठरला खरा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बिहारच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी दिवसभर टीव्ही चॅनेल्स व सोशल मिडियातून विविध चर्चा घडवत असताना या निवडणुकीचे आगळेवेगळे नगर कनेक्शनही यानिमित्ताने स्पष्ट झाले. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील शिवाजी खोडदे या युवकाने मुंबईच्या प्रबोधन रिसर्च ग्रुपच्या माध्यमातून या निवडणुकीचे निकालापूर्वीचे केलेले विश्लेषण व निकालाचा वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर मुंबई-दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोदी-नितीशकुमार यांच्या 'एनडीए'ला १२५ व त्यांच्याविरोधातील तेजस्वी यादव व राहुल गांधी यांच्या 'महागठबंधन'ला १०१ जागांचा अंदाज त्याने वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर 'एनडीए'ला १२५ पर्यंत तर 'महागठबंधन'ला १११ जागा मिळण्याची शक्यता आहे. फक्त या अंदाजामध्ये त्याने अपक्षांना ५ जागा अपेक्षित धरल्या असताना त्या प्रत्यक्षात ७ वर गेल्याने त्या-त्या मतदारसंघातील स्थानिक फॅक्टर तसेच निवडणुकीतील ऐनवेळचे मुद्दे व प्रचाराचे नियोजन कारणीभूत ठरले असावे, असा अंदाज खोडदे यांनी व्यक्त केला.

देशातील मोदी सरकार व त्यांच्याविरोधातील अन्य सर्व असे चित्र बिहारच्या निवडणुकीत होते. स्थानिक बिहारच्या स्तरावर नितीशकुमार व तेजस्वी यादव यांच्यातील संघर्षाला देशाच्या राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी असल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली. त्यामुळे देशभरातील विविध चॅनेल्स व अभ्यासकांनी या निवडणुकीचा निकालापूर्वीचा अंदाज व्यक्त करताना महागठबंधनला झुकते माप दिले होते. पण प्रबोधन रिसर्च ग्रुपने 'एनडीए'चीच सरशी होईल, असे भाकीत वर्तवले होते. ते बऱ्याचअंशी खरे ठरले आहे. प्रबोधन रिसर्च ग्रुपचे अध्यक्ष विनोद जोशी व सचिव शिवाजी खोडदे यांनी कोरोना काळामुळे प्रत्यक्ष बिहारमध्ये न जाताही तेथील संपर्क तसेच तज्ज्ञांशी नियमित संवाद आणि गावपातळीवरील राजकारणाची माहिती संकलित करून विश्लेषण केले होते. त्यामुळे त्यांनी देशातील राजकीय हवेपेक्षा प्रत्यक्ष बिहारमध्ये काय आहे, हे अभ्यासून विश्लेषण व अंदाज वर्तवला होता.

नगरच्या युवकाचा यातील यशस्वी सहभाग त्यामुळेच बिहार निवडणुकीशी नगरचे कनेक्शन जोडून गेला. शिवाजी खोडदे १९९६पासून प्रबोधन रिसर्च ग्रुपमध्ये विविध प्रकारच्या निवडणुकांमधील मतदारांच्या भूमिकांचे विश्लेषण करतात. महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक, उत्तराखंड, दिल्ली अशा निवडणुकांसह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचाही असा अभ्यास त्यांनी केला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकाच नव्हे तर जिल्हा परिषदा-महापालिका-नगरपालिका निवडणुकांमध्ये एसटी, रेल्वे, गाडी वा मिळेल त्या वाहनाने गावा-गावात जाऊन तेथील जनतेची मानसिकता अभ्यासणे, स्थानिक प्रश्नांच्या सद्यस्थितीबद्दल जनतेच्या भावना जाणून घेणे व त्यातून जनतेची मानसिकता अभ्यासण्याच्या आवडीतून त्यांनी निवडणूकपूर्व निकालाचे अंदाज वर्तवणे सुरू केले होते. नगरच्या युवकाचे असे अनोखे संशोधन त्याच्यासाठी कौतुकास्पद असले तरी जिल्ह्याची राजकीय संवेदनशीलता व जागरूकता सर्वसामान्यांपर्यंत कशी झिरपली, याचा प्रत्ययही देणारे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post