दिवाळी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शनिवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि श्री लक्ष्मीपूजन हे दीपोत्सवातील दोन महत्त्वाचे मंगल योग आहेत. शनिवारी पहाटे स्नान होताच देवांचे पूजन करून घरी केलेला फराळ दाखवून इष्टमंदिरात जाऊन देवासमोर फराळ ठेवणे. ज्या स्नेहीजन मित्राकडे कोणी स्वर्गस्थ झाले असेल, त्यांची सांत्वना म्हणून फराळ द्यावा. सर्वश्रेष्ठ मानवधर्म या वर्षी सर्वांनीच पाळलाच पाहिजे असा आहे.

श्री लक्ष्मीपूजन
दीपावली महोत्सवी, चार प्रमुख दिवसांपैकी ‘चतुर्दशी’ या प्रथम दिवशीच दुपारी 2.17 ला संपून 2.18 ला अमावस्या चालू होते. दुपारनंतर अमावस्येचे लक्ष्मीपूजनोत्सवाचे कार्यक्रम चालू होणार असल्यामुळे दिवाळी मुहूर्तावर चालू करावयाचे सर्व शुभारंभी सोहळे सकाळीच सूर्योदय ते दुपारी 2 पूर्वी नैवेद्य, महाप्रसाद- मिष्टान्‍न भोजनाने संपन्‍न करावेत आणि संध्याकाळी व रात्री लक्ष्मीपूजनाची तिथी असल्यामुळे प्रदोषकाळी दिवेलागणीच्या ‘संध्या’समयी सायं. 6.30 ते रात्री 8.30 पर्यंत, रात्री 9 ते 11 पर्यंत ‘लक्ष्मीपूजन’ सोहळा करावा. (क्षयिष्णु औदसा - अलक्ष्मी) दारिद्य्र पळवून लावण्यासाठी नव्या केरसुणीचे (ही दारिद्य्र झटकण्यासाठी) पूजन हा या दीपोत्सवातील प्रमुख भाग असतो. जुन्या कचर्‍याबरोबरच जुन्या केरसुणीचे विसर्जन करून नवी केरसुणी ही नवलक्ष्मीच्या वर्धिष्णुतेचेच एक प्रतीक.

पेढे, बर्फी वगैरे इतर मिठाई कितीही खोकी - पेटारे भरभरून नैवेद्य दाखवून वाटली तरीही बत्तासे - साखरफुटाणे, लाह्या-चिरमुरे यांची उधळण ही ‘बहुजन हिताय। बहुजन सुखाय।’चे प्रतीक हे कधीही विसरायचे नाही.

धनलक्ष्मी नमस्तुभ्यम्
सर्व-वैभव-वर्धिनी।
नूतने विक्रमे-वर्षे (2077)
भव समृद्धि -दायिनी॥

अशी प्रार्थना करून ॥ ॐ ॥ ॥ श्री ॥ स्वस्तिक चिन्ह चित्रांकित चौरंगावरील लक्ष्मीला भक्‍तिभावभरित हृदयाने पूजावे, भजावे आणि पुढील वर्षाच्या भरभराटीची सर्वांनी साष्टांग दंडवताने देवीला पूर्ण शरणागतीने प्रार्थना करावी. लक्ष्मी प्रसन्‍न होऊन सर्व मंगलकामना, सदिच्छा पूर्ण करते.

श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त
सायंकाळी 6.30 ते 8.30
रात्री 9.00 ते 11.00

Post a Comment

Previous Post Next Post