जमिनीखाली दगडी कोळसा कसा निर्माण होतो?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दगडी कोळसा हा मुख्यतः वनस्पतींपासून आलेल्या कार्बनी पदार्थांचा बनलेला खडक असतो. तो मुख्यत्वे करून थरांच्या रूपात आढळतो आणि त्याचे थर शेल, पंकाश्म किंवा वालुकाश्म यांच्या सारख्या गाळाच्या खडकांच्या थरांत अंतःस्तरित म्हणजे अधूनमधून आढळतात.

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या वनस्पती व त्यांचे भाग ही दलदलीत वा उथळ पाण्यात साचत राहून त्यांच्या सामान्य किंवा प्रचंड जाडीच्या राशी तयार झाल्या. नंतर त्या राशींवर वाहत्या पाण्याबरोबर आलेला गाळ साचविला गेला. अशा रीतीने गाळाखाली पुरल्या गेलेल्या वनस्पतिज पदार्थांपासून दगडी कोळसा तयार झालेला असतो.

#उत्पत्ती :
कोळसा हा वनस्पतिज पदार्थांपासून तयार झालेला असतो, ही गोष्ट सु. दीडशे वर्षांपूर्वीच मान्य झालेली होती. पण तो कसा तयार होतो ? जमिनीवरील वनस्पतींपासून की सागरातील वनस्पतींपासून ? पाने, फांद्या, खोडे इ. वनस्पतिज पदार्थ साचून त्यांचे ढीग कसे तयार झाले ? ते ढीग समुद्राच्या तळावर साचले का जमिनीवरील सरोवराच्या तळावर ? इत्यादींसंबंधीची माहिती प्रारंभी अर्थातच नव्हती पण ती उत्तरोत्तर मिळत गेली. दगडी कोळशाच्या निर्मितीच्या बर्‍याचशा अंगांविषयी निश्चित माहिती आता उपलब्ध झालेली आहे.

सूक्ष्मदर्शकासारखी उपकरणे आणि इतर आधुनिक पद्धती वापरून केलेल्या बिट्युमेनी कोळशाच्या परीक्षणावरून असे कळून आलेले आहे की, त्याच्यात चिंब भिजून छिन्नविच्छिन्न झालेल्या व कमीअधिक अपघटित झालेल्या पदार्थांचे अनेक अवशेष आढळतात व ते मुख्यतः जमिनीवर किंवा जमिनीवरील दलदलीत वाढणाऱ्या वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने आण करणारे शरीर घटक असणाऱ्या) वनस्पतींपासून आलेले असतात. अशा अवशेषांपैकी मुख्य म्हणजे काष्ठ, बीजुकाशय इत्यादींचे अवशेष व रेझीन, मेण, डिंक इ. पदार्थ होत. सारांश दलदलीत, कच्छ दलदलीत किंवा पाणथळ जमिनीत वाढणाऱ्या वाहिनीवंत वनस्पतींपासून बिट्युमेनी कोळसा तयार झालेला असतो. अशा वनस्पतींच्या शरीरांचे भाग साचून पिटाचे थर तयार झाले, ते गाळाखाली पुरले जाऊन त्यांच्यापासून कोळशाचे सामान्य प्रकार तयार झाले व काही असामान्य परिस्थितींत विशेष प्रकारचे पीट साचून व ते गाळाखाली पुरले जाऊन बॉगहेड वा कॅनल कोळसा याच्यासारखा कोळसा तयार झाला, या गोष्टी आता सर्वमान्य झाल्या आहेत.

कोळशाचे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे असे जे थर असतात, ते विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेले असतात. ज्या वनस्पतिज पदार्थांच्या राशींपासून ते तयार झाले, त्या राशीही जमिनीवरील विस्तीर्ण क्षेत्रावर पसरल्या असल्या पाहिजेत. शिवाय ज्यांच्यात केवळ वनस्पतिज पदार्थांचीच भर पडावी व वाळू मातीची पडू नये, अशी वनस्पतिज पदार्थ साचण्याची क्षेत्रे असावी लागतात. म्हणजे ती क्षेत्रे जवळजवळ सपाट अशा प्रदेशात असावी लागतात. त्यांच्या जवळपास डोंगर नसावेत किंवा डोंगरावरून वाहत येणारे व वाळू माती यांसारखा गाळ आणणारे पाण्याचे प्रवाह त्यांच्यात शिरत नसावेत. कित्येक मैदानी प्रदेशांत, नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांत व समुद्रकिनाऱ्यालगतच्या कच्छ दलदलींत वनस्पतिज पदार्थांच्या जाड राशी साचण्यास अनुकूल अशी परिस्थिती असलेली विस्तीर्ण क्षेत्रे असतात.

(कोरा या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.) 

Post a Comment

Previous Post Next Post