देशात करोना लशीचा फक्त आपत्कालीन वापर? केंद्र सरकारकडून विचार सुरू

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत व तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार आजमावत आहे. निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरोना लशींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान कार्यालयाने गठित केलेले लस कृती दल (व्हॅक्सिन टास्क फोर्स-व्हीटीएफ) या लशीच्या आणीबाणीकालीन वापराच्या अधिकारांचे नियम तयार करेल, तर या लशी देण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाने (नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९- एनईजीव्हीएसी) या लशीच्या किमतीसह ती बाजारात आणण्याबाबतचे धोरण तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्राने दिली आहे. दरम्यान, भारतात पाच लशी वैधानिक चाचण्यांच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये आहेत. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का कोविड-१९ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे; तर भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी देशात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन जॅबच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यापूर्वीच सुरू केल्या आहेत. झायडस कॅडिलाने स्वदेशात विकसित केलेल्या लशीने दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. तर रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील एकत्रित चाचण्यांना डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लवकरच सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post