युवतीच्या जिद्दीला दाम्पत्याने दिली ताकद; फुंदेंमुळे श्वेता होणार घराची आई

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आई-वडिल नसताना स्वतःसह चार भावंडे व आजी-आजोबांना आईच्या मायेने सांभाळणाऱ्या १५ वर्षाच्या श्वेता या युवतीच्या पाठीशी नगरमधील फुंदे शिक्षक दाम्पत्य खंबीरपणे उभे राहिले आहे. या मुलीला त्यांनी शिवण यंत्र घेऊन दिले असून, तिनेही शिवण क्लास केला असल्याने या यंत्राद्वारे विविध कपडे शिवून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचे तिने ठरवले आहे.

दोन वर्षापूर्वी आईचे निधन झाल्याने पाचही लेकरे पोरकी झाली. आईच्या जाण्याच्या दुःखाच्या जखमा ओल्या असतानाच आठ महिन्यापूर्वी वडिलांनी आयुष्य संपवलं. दगडवाडी येथील शिंदे कुटुंबावर आभाळ फाटल्यागत दुःखाचा डोंगर कोसळला. नव्वदीच्या घरात असलेल्या आजी-आजोबांवर नातवंडांच्या संगोपनाच्या जबाबदारी आल्याने मरता येईना म्हणून जगायची वेळ आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर वंचितांसाठी काम करणार्‍या गुरुकुल व सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्यांनी लगेच दगडवाडी गाठली. तिथे गेल्यानंतर परिस्थिती विदारक दिसली. घरातील सर्वात मोठी मुलगी श्‍वेता दहावीत शिकतेय व शेवटच भावंडं दोन वर्षाचे आहे. अशी परिस्थिती पाहता त्या पाचही लेकरांचे शैक्षणिक पालकत्व फुंदे दाम्पत्याने स्वीकारले व आजी-आजोबांना जगण्याचा आधार देत श्‍वेताच्या पायात बळ निर्माण करण्याचा दाम्पत्याने निर्धार केला. ज्य़ेष्ठ गायिका व गानकोकिळ लता मंगेशकर यांचे उदाहरण देत श्‍वेता तूच आता या भावंडांची आई हो, आम्ही पाठीशी आहोत असे म्हणत घर चालवण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून श्‍वेताला शिवण क्लास लावून तिला शिलाई मशीन देण्याचा शब्द फुंदे दाम्पत्याने दिला. श्‍वेताने क्लास पूर्ण केला. त्यामुळे फुंदे परिवाराने दिवाळीनिमित्त या संपूर्ण कुटुंबाला नवीन कपडे भेट देत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्‍वेताला शिलाई मशीन भेट दिली.

दुःखितांचे अश्रू पुसत काहीअंशी अशीच व्यथा असलेल्या आणखी दोन कुटुंबांसोबत फुंदे दाम्पत्याने साजरी केलेल्या दिवाळीचे कौतुक होत आहे. यावेळी गुरुकुल मंडळाचे शिक्षक नेते आसाराम शिंदे, रविंद्र शिंदे, अनिल शिंदे, महादेव शिंदे उपस्थित होते. श्‍वेताने जिद्दीने भावंडांसाठी आईची भूमिका निभावण्याची दाखवलेली तयारी आणि फुंदे दाम्पत्याचे दातृत्व निश्‍चितच समाजातील पिडीत दुःखितांना जगण्यास उभारी देण्यास प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post