ग्वाल्हेरच्या महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा लागला शोध

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पेशवाईच्या काळात आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीचा झेंडा अटकेपार रोवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता, अशा महादजी शिंदे यांच्या चौथ्या पत्नीच्या समाधीचा नुकताच शोध लागला आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांच्या दोन दशकांच्या संशोधनानंतर हा शोध लागला आहे. संगमनेरच्या देशमुख परिवाराची लेक असलेल्या भवानीबाई या महादजी शिंदे यांच्या चौथ्या पत्नी होत्या. देशमुख कुटुंबाचे सध्याचे वारस महानंदचे व संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी डॉ. खेडलेकर यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील नगरसुल येथे जाऊन या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

यासंदर्भात डॉ. खेडलेकर यांनी दिलेली माहिती अशी की, 23 डिसेंबर 1777 रोजी महादजी शिंदे आणि संगमनेरच्या अंभोरकर देशमुख यांच्या कुटुंबातील भवानीबाई यांचा विवाह संगमनेर येथेच झाला होता. भवानीबाई या भवानी मातेच्या निःस्सीम भक्त होत्या तसेच अंभोरकर देशमुख परिवाराचे आध्यात्मिक गुरू भवानीबाबा यांच्यावरही त्यांची भक्ती होती. या दोन्ही ठिकाणी दर्शनाचा त्यांचा नित्यनेम होता. विवाहानंतर ग्वाल्हेरच्या या महाराणीने आपल्या सासरी म्हणजे ग्वाल्हेरला न जाता संगमनेरलाच वास्तव्य करणे पसंत केले. महादजी शिंदे ग्वाल्हेरहून पुण्याला व पुण्याहून ग्वाल्हेरला परत जाताना संगमनेरला थांबायचे. 1780 मध्ये महादजींनी भवानीबाई यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आग्रहाने ग्वाल्हेरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. संगमनेरहून कोपरगावमार्गे पुढे निघाल्यावर हा लवाजमा नगरसुल येथे मुक्कामाला थांबला असता भवानीबाईंनी बोटातल्या अंगठीतील हिरा गिळून देहत्याग केला होता. ही माहिती अंभोरकर देशमुख परिवाराकडे होती. मात्र, नगरसुल येथे त्यांची समाधी कुठे आहे, याबाबत माहिती मिळत नव्हती.

तीन-चार महिन्यांपूर्वी डॉ. खेडलेकर यांनी सोशल मिडियावर संगमनेरच्या इतिहासावर लिहिलेले विविध लेख वाचून नगरसुलचे इतिहास अभ्यासक विनोद पाटील यांनी खेडलेकर यांच्याशी संपर्क साधून या समाधीबाबत माहिती दिली. त्यामुळे 17 नोव्हेंबर रोजी संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी डॉ. खेडलेकर यांना बरोबर घेऊन नगरसुलला भेट दिली. नगरसुल गावाबाहेर एका शेतात बरेच अंतर आत गेल्यावर या समाधीचे दर्शन झाले. या समाधीवर भवानीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर बांधले आहे. सध्या या शेताचे मालक असलेल्या संजय खैरनार यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, आमच्या आजीच्या सांगण्यानुसार एका राजाच्या राणीने या शेतात राजाचा मुक्काम असताना हिरा गिळला होता, त्या राणीची ही समाधी आहे.

समाधीला भेट दिल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, गेली २४० वर्षे अज्ञातवासात असलेच्या आमच्या भवानीबाईंच्या समाधीचा शोध हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. डॉ. खेडलेकर यांनी भावना व्यक्त करतांना म्हटले की, इतिहासाच्या अंधाऱ्या गुहेत भटकंती करताना जेव्हा असा एखादा शोध लागतो, तेव्हा होणारा आनंद शब्दात वर्णन करणे कठीण असते. भवानीबाईंच्या मंदिरात प्रवेश करताच अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला, असे ते म्हणाले. यावेळी नगरसुलचे इतिहास अभ्यासक विनोद पाटील, महानंदचे संचालक सुभाष निकम, पिंपरणे येथील नवनीत देशमुख, अजित देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post