एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज शाळेजवळ खेळताना हालचाल करणारा कचरा पाहून उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या
विद्यार्थ्यांनी त्या कचऱ्याचे बारीक निरीक्षण केल्यावर तो कचरा नसून
कचऱ्यासारखा दिसणारा जीव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच
निसर्गप्रेमींशी संपर्क साधला. त्यानंतर या निसर्गप्रेमींनी या कचऱ्याचे
निरीक्षण केल्यावर भारतातील काही ठिकाणी व श्रीलंकेत आढळणारा 'व्हायोलिन
मॅंटीस' हा आगळावेगळा व दुर्मिळ कीटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा
दुर्मिळ कीटकाचा शोध लावणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुकही केले.नगर
तालुक्यातील वाकीवस्ती तसेच करंजी जवळील कोल्हेवाडी परिसरात शालेय
विद्यार्थी तन्वी अकोलकर, प्रियंका अकोलकर व शिवराम अकोलकर या
विद्यार्थ्यांना खेळताना कचर्याची हालचाल होताना दिसले. सूक्ष्म निरीक्षण
केल्यावर तो कचरा नसून जीव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नगर येथील
जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते
यांच्याशी संपर्क केला. तसेच वडील सचिन अकोलकर यांच्यामार्फत या कीटकाची
छायाचित्रे व व्हिडीओही पाठवले. तसेच सातपुते यांच्याकडून माहिती घेऊन व
त्यांच्या मार्गदर्शनाने त्या कीटकाला लगेच निसर्गात मुक्तही केले.
या
कीटकाबद्दल माहिती देताना सातपुते यांनी सांगितले की, हा मॅंटीस प्रजातीतील
व्हायोलिन मॅंटिस नावाचा कीटक असून त्याची लांबी १२ ते १५ सेंटीमीटर असते.
हा अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती देत विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचे
त्यांनी विशेष कौतुक केले. मॅंटिस प्रजातीतील कीटक स्वरक्षणार्थ
परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन निसर्गाशी समरूप होण्यात अग्रेसर असतात.
वाळलेल्या पानांप्रमाणे निसर्गाशी साम्य असलेल्या रूपामध्ये त्यांचे शरीर
उत्क्रांत झालेले असते. त्यामुळेच त्यांचे वास्तव्य सहजासहजी कोणाच्याही
लक्षात येत नाही. कलाशिक्षक स्वदीप खराडे यांनीही अशाच आणखी एका कीटकाची
नोंद नुकतीच जेऊरजवळील वाकीवस्ती या ठिकाणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी
दिली.
भारत व श्रीलंका या देशांमधील काही भागात याचा विशेष नैसर्गिक
अधिवास असतो तसेच लहान असल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत तो अनेक वेगवेगळे रंग
व रूपे बदलतो. ३० ते ४० अंश तापमान व आर्द्रता त्याच्या वाढीसाठी पोषक
असते. त्याचे मुख्य अन्न इतर लहान कीटक, माशा, फुलपाखरे असून त्याचे शरीर
व्हायोलिनच्या आकाराप्रमाणे दिसते. तापमानाच्या बाबतीत ही प्रजाती
अतिसंवेदनशील असल्याने तिचे प्रजनन कमी होते. यामुळेच निसर्गात या कीटकांची
संख्या अतिशय कमी असून हे दुर्मिळ आहेत, अशी माहिती जैवविविधता संशोधन व
संवर्धन समूहाचे कीटक अभ्यासक प्रितम ढगे, अमित गायकवाड व सोमनाथ कुंभार
यांनी दिली. दरम्यान, नगर जिल्ह्यात जैवविविधता संशोधन समूहातर्फे विविध
विषयांवर निसर्ग अभ्यास सहली काही वर्षांपासून सातत्याने राबविल्या जात
असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये निसर्गाप्रती संशोधकता,
संवेदनशीलता व जागरूकता वाढत आहे. निसर्गातील अशा आगळ्या वेगळ्या
गोष्टींच्या माहितीची नोंद ते सातत्याने संस्थेकडे करीत असल्याची माहिती
निसर्गअभ्यासक सातपुते यांनी दिली.
Post a Comment