मैदा आणि साखर शरीरासाठी हानिकारक का असतात?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज


मैदा :
आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.

मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात. उदा – बिस्किट्स नानकटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, रोटी, नान, नूडल्स, केक हे सर्वच पदार्थ मैद्यापासुन बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया :
गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी परिरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.

गुणधर्म खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मैद्यामध्ये असतो. मैद्यमध्य फक्त काबरेहायड्रेट्स, जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मैद्यापसून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.

आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या क्रियेत क्रोमियम, झिंक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये आवश्यक आहेत; परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थाना गरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

पर्यायी पदार्थ :
सर्व पदार्थ बनविण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.

मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

आहारात साखरेचे प्रमाण किती असावे?
आपल्या आहारामध्ये आपण सेवन करीत असलेल्या चहा, कॉफी किंवा इतर गोडधोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण हा आहारतज्ञांचा अगदी आवडता विषय असतो. आताच्या बदलत्या खानपानाच्या सवयींमुळे, आपण ही आपल्या आहारामधील साखरेच्या प्रमाणाबद्दल अधिकच जागरूक झालेले आहोत. सध्या वाढीला लागलेल्या मधुमेह, स्थूलपणा, रक्तदाब या विकारांना पाहता ते योग्य ही आहे.

पण साखर आपल्याला वाटते तशी आरोग्याच्या बाबतीतली 'खलनायिका' खरोखरच आहे का? जागतिक आरोग्य परिषदेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) एका दिवसामध्ये सहा ते आठ लहान चमचे साखर खाणे योग्य आहे, असे म्हटले आहे. आपले आहारतज्ञ जितकी साखर खाण्याचा सल्ला आपल्याला देतात, त्यापेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे.

साखर ही अनेक निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपण नित्य वापरत असलेली रिफाईन्ड साखर असते, कृत्रिम स्वीटनर्स असतात, आणि फळे व भाज्यांमधून मिळणारी फ्रुक्टोज व ग्लुकोज सारखी नैसर्गिक शर्काराही असते. कृत्रिम स्वीटनर्स मध्ये स्टेविया, सॅखरीन, सुक्रोज, आणि अॅस्पारटेम ह्यांचा समावेश आहे. ही सर्व स्वीटनर्स 'शुगर फ्री' असून आपल्या आहारामध्ये साखरेऐवजी वापरावयाची असतात. फळे आणि भाज्यांमधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण दर भाजी किंवा फळामध्ये वेगवेगळे असते. पण ही नैसर्गिक साखर आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगली समजली जाते.

भारतामध्ये बहुतेक ठिकाणी उसाच्या रसापासून तयार केलेली साखर वापरण्यात येते. त्यामुळे ही साखर योग्य प्रमाणात सेवन केली गेल्यास तितकी अपायकारक नाही. पण प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड अन्नपदार्थांमध्ये असलेली साखर कॉर्न सिरप सारख्या पदार्थांपासून तयार केली जाते. त्यामुळे अश्या अन्नपदार्थांचे सेवन शक्यतो टाळणे उत्तम. आपल्या आहारामध्ये साखर खाण्याची गरजच नाही असे काही आहारतज्ञांचे मत आहे. आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमधून आपल्याला मिळत असलेले स्टार्च, प्रथिने आणि फॅट्स आपल्या शरीरामध्ये ग्लूकोज तयार करीत असतात. तसेच प्रत्येकाने फायबर व कॉम्प्लेक्स कर्बोदके असलेला संतुलित आहार घेतला पाहिजे, असे आहारतज्ञांचे मत आहे.

साखर आपल्या आरोग्यास हानिकारक नसून, ती ज्या पद्धतीने खाल्ली जाते, त्या पद्धती आरोग्यास अपायकारक असल्याचे सुप्रसिद्ध आहार तज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात.

साखर ही ‘ पंच अमृतां ‘ पैकी एक असून याचे सेवन फार प्राचीन काळापासून आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र सध्या प्रोसेस्ड अन्नपदार्थ, पॅकेज्ड ज्यूस, योगर्ट, बेकरी उत्पादने यांच्या मार्फत जी साखर सतत खाल्ली जाते, ती पद्धत अपायकारक असल्याचे म्हणतात.

आताच्या काळात साखरेच्या अतिसेवनाने उद्भविणाऱ्या आजारांमध्ये स्थूलपणा, मधुमेह असे विकार सर्रास दिसून येत असतात. त्याचबरोबर प्रमाणाबाहेर साखर आहारात असल्याने शरीराची मेटाबोलिझम शिथिल होते, अगदी क्वचित प्रसंगी लिव्हर खराब होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण साखरेचे प्रमाण किती ठेवायचे हा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यायला हवा.

(कोरा संकेतस्तळावर आरोग्य सल्लागार निकीता अलाई यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post